गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

आदिवासींनीच केंद्रातील सरकार व मोदींना पंतप्रधान बनवलं-अमित शहा

Friday, 18th October 2019 07:44:18 AM

 

गडचिरोली, ता.१८: देशातील खासदारांमध्ये सर्वाधिक आदिवासी खासदार भाजपचे असून, आदिवासींनीच देशात भाजपचं सरकार आणून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवलं, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केले.

अहेरी विधानसभा क्षेत्राचे भाजपचे उमेदवार अम्ब्रिशराव आत्राम यांच्या प्रचारार्थ आलापल्ली येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. मंचावर खा.अशोक नेते, आ. डॉ.रामदास आंबटकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे व गडचिरोली आणि आरमोरी विधानसभा क्षेत्राचे उमेदवार अनुक्रमे डॉ.देवराव होळी व कृष्णा गजबे उपस्थित होते.

श्री.शहा म्हणाले की, बांबूला परवानामुक्त केल्याने सर्वसामान्य माणूस आता बांबूपासून रोजगार मिळणार आहे. गौण वनोपजावर आधारित कारखाने निर्मितीवर सरकार भर देणार असून, सुरजागड लोकप्रकल्प सुरु करुन स्थानिकांना रोजगार दिला जाईल. कर्करोगाच्या रुग्णांना यापुढे मुंबईला जावे लागणार नाही. मुलचेरा तालुक्यातील चेन्ना प्रकल्प सुरु करण्याचा सरकारचा मानस आहे. यामुळे सिंचनाची समस्या सुटेल, असे श्री.शहा म्हणाले. आदिवासींबरोबरच ओबीसींना संवैधानिक मान्यता देण्याचे काम सरकारने केले, असे अमित शहा यांनी सांगितले.

कलम ३७० हटविल्यामुळे काश्मिर आतंकवादमुक्त झाला आहे. पाच वर्षाच्या काळात देशातील नक्षल कारवायाही बऱ्यांच अंशी आटोक्यात आल्या असून, पुढील पाच वर्षांत नक्षलवादही देशातून हद्दपार होईल व मागास भागातील युवक भयमुक्त वातावरणात इतरांशी स्पर्धा करु शकतील, असे गृहमंत्री अमित शहा म्हणाले. काँग्रेसने ७० वर्षांत आदिवासींसाठी काय केले, असा सवाल करुन अमित शहा यांनी भाजप सरकार आदिवासींसाठी भरीव काम करीत असल्याचे सांगितले. त्यांनी आपल्या भाषणात अनेकदा आदिवासी वीर बाबूराव शेडमाके यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचा उल्लेख केला.

कुणीच बोलले नाही अहेरी जिल्हा निर्मितीवर

अहेरी जिल्हा निर्मिती व्हावी, अशी त्या भागातील पाचही तालुक्यांतील नागरिकांची मागणी आहे. परंतु आजच्या सभेत कुणीच त्या विषयीचा साधा उल्लेखही आपल्या भाषणात केला नाही. याबाबत उपस्थित नागरिकांमध्ये नाराजीच्या स्वरात कुजबूज सुरु होती.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
HO4I9
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना