शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

निकृष्ट बंधारा प्रकरण: एसडीई, जेईसह कंत्राटदारावर गुन्हे दाख्ल

Sunday, 22nd September 2019 06:16:41 AM

 

नंदकिशोर वैरागडे/कोरची, ता.२१: कोरची तालुक्यातील बोरी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील हुडुकदुमा येथे चार महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेला सिमेंट बंधारा वाहून गेल्याप्रकरणी जल व मृद संधारण विभागाचे उपविभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंता व कंत्राटदारावर कोरची पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेची सूत्रे स्वीकारल्यानंतर राज्यभरात जलयुक्त शिवार योजनेच्या कामांना गती दिली. मुख्यमंत्र्यांची महत्वाकांक्षी योजना असल्याने त्यांनी त्यासाठी  कोट्यवधी रुपयांचा निधीही उपलब्ध करून दिला. त्यातूनच गडचिरोली जिल्ह्यात चंद्रपूर येथील मृद व जलसंधारण विभागामार्फत मोठ्या प्रमाणावर जलयुकत शिवार योजनेची कामे करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून बोरी ग्रामपंचायतींतर्गत हुडुकदुमा येथे १० टीसीएम क्षमतेचा एक बंधारा जंगलातून येणाऱ्या नाल्यावर लक्षावधींचा खर्च करुन बांधण्यात आला. कोरची तालुक्यात पडयालजोब येथे तीन बंधारे, घुगवा येथे दोन, हेटाळकसा पाच, हुडुकदुमा दोन, खसोडाला दोन,काडे दोन असे १६ बंधारे मंजूर करण्यात आले.  सोळाही बधाऱ्यांच्या कामावर कनिष्ठ अभियंता किंवा उपविभागीय अभियंता यांनी कधी भेट दिली नाही. परिणामी कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले.  

बंधारा वाहून गेल्याचे वृत्त सर्वप्रथम गडचिरोली वार्ताने ३१ ऑगस्ट रोजी  प्रसिद्ध  केल्यानंतर खळबळ उडाली होती उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ११सप्टेंबरला हुडूकदुमा येथे प्रत्यक्ष जाऊन चौकशी केली. त्यात हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आले.

उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया जाधव व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मेश्राम यांनी केलेल्या पाहणीत प्रथमदर्शनी बंधाऱ्याच्या पायाचे काम निकृष्ट असल्याचे स्पष्ट झाले होते

या प्रकाराची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी उपविभागीय अधिकारी तथा अध्यक्ष जलयुक्त शिवार अभियान समिती कुरखेडा यांना संबंधित कंत्राटदार व यंत्रणेच्या अधिकार्‍याविरुद्ध तातडीने एफआयआर नोंदविण्याचे निर्देश दिले होते. .त्यानुसार उपविभागीय अधिकारी तथा जलयुक्त शिवार अभियान समितीचे अध्यक्ष समाधान शेंडगे यांनी कोरची येथील नायब तहसीलदार रेखा बोके यांना  प्राधिकृत करुन आज कोरची पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी उपविभागीय अभियंता वाय.जी.बरडे, कनिष्ठ अभियंता एम.टी.पेंदाम व कंत्राटदार शताब कुरेशी यांच्यावर अपराध क्रमांक ४०/१९, भादंवि कलम ४३१, ४०९, ४६८,४७१,४२०,३४ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. कोरचीचे प्रभारी पोलिस अधिकारी विनोद गोडबोले प्रकरणाचा तपास करीत आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
RL1UK
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना