मंगळवार, 19 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

ब्रम्हपुरी विधासभा क्षेत्र शिवसेनेच्या कोट्यात; प्रशांत कामडे संभाव्य उमेदवार?

Friday, 20th September 2019 12:26:43 AM

ब्रम्हपुरी,ता.२०: काँग्रेसचे हेवीवेट लीडर विजय वडेट्टीवार निवडणूक लढविणार असलेल्या ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातून उमेदवार उभा करण्यास भाजप अनुत्सूक असून, हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. नागपुरातील भाजपचे तरुणतुर्क नेते प्रशांत कामडे यांचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार म्हणून नाव घेतले जात आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते व प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय वडेट्टीवार हे सध्या ब्रम्हपुरी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. ते पुन्हा याच मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे प्रा.अतुल देशकर, वसंत वारजूरकर, कृष्णा सहारे इत्यादी उमेदवार निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत. तशी तयारीही त्यांनी केली आहे. मात्र, युतीच्या राजकारणात वेगळीच चर्चा ऐकायला मिळत आहे. ब्रम्हपुरी मतदारसंघ शिवसेनेला द्यायचा आणि वरोरा मतदारसंघ भाजपकडे ठेवायचा, असा विचार भाजप करीत असून, पक्षनेत्यांनी तसा प्रस्ताव शिवसेनेला दिल्याची चर्चा आहे. ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातून पहिल्यांदाच १९९० मध्ये नामदेव दोनाडकर विजयी झाले होते. त्यानंतर दोनाडकर हे छगन भुजबळ यांच्यासमवेत काँग्रेसवासी झाले आणि पुढे १९९५ पासून हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला. त्यावेळी भाजपचे उमेदवार वासुदेव पाथोडे यांना पराभव पत्करावा लागला. तेव्हा सुरेश उर्फ बाबासाहेब खानोरकर हे जनता दलाच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र, याच निवडणुकीपासून पाय पसरत भाजपने १९९९ (उद्धवराव शिंगाडे), २००४ व २००९ (दोन्ही वेळा प्रा.अतुल देशकर) अशा सलग तीन वेळा विजय मिळवला. परंतु २०१४ मध्ये काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी भाजपला धूळ चारत तब्बल ३० वर्षांनंतर काँग्रेसला प्रतिनिधीत्व मिळवून दिले.

विजय वडेट्टीवार यांची ताकद लक्षात घेता भाजपने ब्रम्हपुरी मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याचा प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे. ब्रम्हपुरीऐवजी भद्रावती मतदारसंघाला भाजपने प्राधान्य दिले आहे. मात्र,अलिकडेच चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना भद्रावती मतदारसंघातून निवडणूक लढायची असून, शिवसेनेने त्यांना तसा शब्दही दिल्याची माहिती आहे. भद्रावती मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, तर ब्रम्हपुरीत भाजपने शिवसेनेला केव्हाचेच गिळंकृत केले आहे. अशा परिस्थितीत युती झालीच तर शिवसेना भद्रावती सोडून ब्रम्हपुरीतून निवडणूक लढेल काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रशांत कामडे असू शकतात संभाव्य उमेदवार?

वरोरा व ब्रम्हपुरी या दोन मतदारसंघांमध्ये अदलाबदल झाल्यास शिवसेनेतर्फे नागपूरचे तेली समाजाचे युवा नेते प्रशांत कामडे यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा सुरु झाली आहे. कामडे यांच्या पत्नी नागपुरात भाजपच्या नगरसेविका असून, हे दाम्पत्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती आहे. शिवसेनेकडे सध्यातरी ब्रम्हपुरीत उमेदवार नाही. त्यामुळे कामडे यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांना तिकिट मिळाल्यास ‘उमेदवार भाजपचा आणि लढणार शिवसेना’ असा रंजक अनुभव येऊ शकतो. लोकसभा निवडणुकीत पालघर मतदारसंघात असा अनुभव तेथील मतदारांनी घेतला आहे, हे येथे उल्लेखनीय. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4DUEV
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना