मंगळवार, 23 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

‘रणरागिनी’ माधुरी मडावी आरमोरीतून काँग्रेसच्या तिकिटावर लढणार?

Wednesday, 11th September 2019 11:19:18 PM

गडचिरोली,ता.११: ‘रणरागिनी’ अशी ओळख असलेल्या गडचिरोलीच्या माधुरी मडावी यांनी शासकीय सेवेचा राजीनामा देऊन राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढण्याचा त्यांचा मानस असून, काँग्रेसचे तिकिट मिळण्यासाठी त्यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे.

माधुरी मडावी ह्या गडचिरोली येथील विद्याभारती कन्या विद्यालयात शिक्षिका होत्या. नागपूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्य म्हणूनही त्या कार्यरत होत्या. २००७ मध्ये नगर परिषदेची निवडणूक लढवून त्या गडचिरोली नगर परिषदेच्या सदस्य झाल्या. परंतु मध्येच राज्यसेवेची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची नगर परिषदेच्या मुख्याधिकारी म्हणून निवड झाली. देसाईगंज, रामटेक, अकोला, पवनी इत्यादी ठिकाणी मुख्याधिकारी म्हणून काम पाहिल्यानंतर त्या अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्याल्यात नगर विकास विभागात सहायक संचालक पदावर कार्यरत होत्या. परंतु आता त्यांनी शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन सक्रिय राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आहे. २९ जुलै २०१९ ला त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला असून, ३१ ऑगस्टला नगर विकास विभागाने त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे.

माजी आमदार तथा काँग्रेसच्या आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आनंदराव गेडाम हे सध्या कॉग्रेसचे प्रबळ दावेदार आहेत. मध्यंतरी वामनराव सावसाकडे यांचेही नाव चर्चेत आले होते. परंतु आता त्यांचे नाव मागे पडले आहे. अशातच मागील काही दिवसांपासून माधुरी मडावी यांच्या नावाची वेगाने चर्चा होत आहे. त्यांना पक्षातील राज्यस्तरीय नेत्यांचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. पोळ्याच्या दिवशी ३० ऑगस्टला माधुरी मडावी यांनी नवी दिल्ली येथे काँग्रेसचे वरिष्ठ नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली होती. मडावी यांना तिकिटाचे आश्वासन मिळाल्यामुळेच त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला असावा, अशी राजकीय मंडळींमध्ये चर्चा आहे.

काँग्रेसच्या यादीत आरमोरी मतदारसंघातून माधुरी मडावी यांचे नाव संभाव्य उमेदवारांच्या यादीत अग्रक्रमांकावर आहे. १३ सप्टेंबरला काँग्रेसच्या छाननी समितीची मुंबईत बैठक होणार असून, त्यात उमेदवारांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. राजकारणात असताना माधुरी मडावी ह्या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. तीच आक्रमकता त्यांनी शासकीय सेवेतही कायम ठेवली. त्यामुळे माधुरी मडावी यांची कारकीर्द बहुतेक सर्वच ठिकाणांची वादग्रस्त राहिली. प्रत्येक ठिकाणी लोकप्रतिनिधींकडून त्यांच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. आता खुद्द त्याच पुन्हा लोकप्रतिनिधी होण्याची धडपड करीत आहेत. त्यात त्यांना किती यश मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4BY9R
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना