गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

आरमोरी क्षेत्रातून भाजप करतेय नव्या उमेदवाराचे लाँचिंग?

Wednesday, 4th September 2019 07:13:09 AM

गडचिरोली, ता.४: विद्यमान आमदारांना पुन्हा तिकिट देण्याचे धोरण भाजपाने जवळपास निश्चित केले असताना आरमोरी विधानसभा क्षेत्रात मात्र स्थानिक नेत्यांकडूनच विद्यमान आमदारांना विरोध केला जात असून, या मंडळींनी नव्या उमेदवाराचे लाँचिंग करण्याचा प्रयत्न चालविला आहे.

जिल्ह्यातील ओबीसींना केवळ ६ टक्के आरक्षण मिळत आहे. याविषयीचा असंतोष अनेक वर्षांपासून धुमसत आहे. भाजपच्या मंडळींनी २०१४ च्या निवडणुकीत ओबीसींमधील हा असंतोष कॅश करुन जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्रातून विजय मिळविला. त्यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्रातून आदिवासींच्या अन्य जमातीच्या उमेदवारांना विरोध दर्शवीत ‘माना’ जमातीच्या कृष्णा गजबे यांना भाजपने रिंगणात उतरविले. गजबे मोठ्या मतांनी निवडूनही आले. परंतु अल्पावधीतच आदिवासींच्या अन्य

जमातींकडून गजबे यांना विरोध होऊ लागला. त्यानंतर ‘ओरिजिनल आदिवासी हवा’ हा नारा भाजपात गुंजणे सुरु झाले. त्यातही आमदार कृष्णा गजबे यांची नव्याने भाजपात आलेल्या काही नेत्यांशी सलगी वाढल्याने जुने नेते दुखावले. या नेत्यांनी मग नव्या उमेदवाराचा शोध घेणे सुरु केले. अशातच गोवारी जमातीचे तरुणतुर्क नेते रुपेश चामलाटे यांचे नाव पुढे आले.

लोकसभा निवडणुकीनंतर गोवारी समाज संघटनेच्या नेत्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष खासदार अशोक नेते यांना निवेदन देऊन आरमोरी क्षेत्रातून गोवारी समाजाच्या उमेदवाराला संधी देण्याची मागणी केली. आदिवासींमधील सर्व जमातीच्या उमेदवारांना भाजपने आतापर्यंत संधी दिली. परंतु विदर्भात १० लाख लोकसंख्या असलेल्या गोवारी जमातीचा केवळ मतांसाठी वापर करुन घेतला, असे या समाजाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्याअनुषंगाने गोवारी समाज संघटनेच्या वारंवार बैठका होत असून, त्यांनी रुपेश चामलाटे यांना रिंगणात उतरविण्याचा चंग बांधला आहे. २ सप्टेंबरला राज्याचे कामगार मंत्री संजय कुंटे गडचिरोलीत आले होते. त्यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. तेव्हा आरमोरीतून १० जणांनी हजेरी लावली. त्यातील बहुतांश इच्छूक उमेदवारांनी ‘ओरिजिनल आदिवासी हवा’ असा सूर मांडला. २३ नोव्हेंबर १९९४ ला नागपुरात निघालेल्या गोवारींच्या मोर्चावर लाठीचार्ज करण्यात आला होता. त्यात ११४ गोवारी बांधव शहीद झाले होते. तेव्हापासून हा समाज कॉग्रेसच्या विरोधात असून, भाजप-सेना युतीसोबत राहिला आहे. आरमोरी क्षेत्रात या समाजाची २२ ते २५ हजार मते आहेत, असे गोवारी संघटनेच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

ही बाब लक्षात घेता आरमोरी क्षेत्रातील भाजप नेत्यांनी रुपेश चामलाटे यांचे नाव पक्षाच्या मोठ्या नेत्यांपर्यंत रेटणे सुरु केले आहे. मूळचे ब्रम्हपुरीचे असलेल्या ३७ वर्षीय रुपेश चामलाटे यांनी भौतिकशास्त्रात एमएससीपर्य्ंतचे शिक्षण घेतले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आरमोरी क्षेत्रातून अशोक नेते यांना मताधिक्य मिळाले असले; तरी कृष्णा गजबे आमदार असताना माना जमातीचे वास्तव्य

असलेल्या गावांमध्ये भाजपला मिळालेली मते कमी होती, असा युक्तिवाद चामलाटे यांचे नाव रेटणाऱ्या भाजप नेत्यांकडून केला जात आहे. म्हणूनच या नेत्यांकडून रुपेश चामलाटे यांच्यासाठी दबाव आणला जात आहे.

एकीकडे, आमदार कृष्णा गजबे यांनी ओबीसींचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रचंड तत्परता दाखवली, त्यामुळे ओबीसींना पुन्हा गजबेच हवे आहेत, तर दुसरीकडे, आदिवासींकडून मात्र प्रचंड विरोध होत असल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने आरमोरीतून लवकरच गोवारी समाजाचे नेते रुपेश चामलाटे यांची भाजप लाँचिंग करेल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
3HPED
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना