शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

सीएम’ च्या सभेला ब्रम्हपुरीत अभूतपूर्व प्रतिसाद; वारजूरकरांची बाजू आणखी भक्कम?

Wednesday, 7th August 2019 02:12:59 AM

 

ब्रम्हपुरी, ता.७: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला ब्रम्हपुरीत मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद बघता भारतीय जनता पक्षात आता वसंत वारजूरकर यांची क्रेझ वाढल्याचे स्पष्‌ट जाणवत असून, काँग्रेसनेही त्याचा धसका घेतला आहे.

ब्रम्हुपुरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे दिग्गज नेते व विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे पुन्हा नशिब आजमावणार आहेत. त्यामुळे वडेट्टीवारांच्या तोडीच्या उमेदवाराचा शोध भाजप घेत आहे. दोनदा आमदार राहिलेले प्रा.अतुल देशकर यांचा २०१४ च्या निवडणुकीत वडेट्टीवारांच्या तडाख्यात टिकाव लागला नाही. प्रा.देशकर हे सभ्य गृहस्थ म्हणून ओळखले जातात. मात्र, वडेट्टीवारांशी दोन हात करताना नुसता सभ्य माणूस उपयोगाचा नाही, हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना कळून चुकले आहे. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीची ब्रम्हपुरीत सभा होऊनही आणि सर्वत्र मोदी लाट असतानाही वडेट्टीवारांनी विजय मिळविला. विदर्भात सर्वच ठिकाणी काँग्रेस भुईसपाट झाली असताना वडेट्टीवारांनी ब्रम्हपुरीत काँग्रेस जीवंत ठेवली. ही बाब तेव्हाच भाजप नेत्यांच्या जिव्हारी लागली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत. ’काँग्रेसमुक्त भारत’ ही संकल्पना काटेकोरपणे अंमलात आणायची असेल, तर दमदार उमेदवार द्यावा लागेल, याचा विचार भाजपने केला आहे. त्याच अनुषंगाने वसंत वारजूरकर यांचे नाव वेगाने पुढे येत आहे.

४ ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा ब्रम्हपुरीत पोहचल्यानंतर तेथे विराट सभा झाली. या सभेसाठी वारजूरकरांनी ब्रम्हपुरीत शहरभर बॅनर व पोस्टर्स लावून वातावरण निर्मिती केली होती. त्यांनी या सभेला गर्दी जमवली होती, याची चर्चा भाजप कार्यकर्त्यामध्ये होत आहे. ही गर्दी बघून खुद्द मुख्यमंत्रीही भारावून गेले आहेत. दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोली येथील पत्रकारपरिषदेतही‘ ब्रम्हपुरीची सभा अभूतपूर्व झाली’, असा आवर्जून उल्लेख केला. तसेच या सभेत चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांनी ‘ब्रम्हपुरीची जागा आणायची आहे’, असा उल्लेख केला. यावरुन ब्रम्हपुरीची जागा जिंकण्याचा पक्का विचार पक्षश्रेष्ठींनी केल्याचे स्थानिक कार्यकर्ते सांगत आहेत.

वसंत वारजूरकर यांच्याशिवाय सावलीचे रहिवासी व राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांनाही ब्रम्हपुरीतून भाजपचे तिकिट मिळू शकते, असा सूर होता. गड्डमवार यांनी भाजपात प्रवेश करावा, असे काही जणांना वाटत होते. त्यासंदर्भात बैठकाही झाल्या. परंतु गड्डमवार हे विश्वासू नसल्याने त्यांना प्रवेश देऊ नये, असा एक मोठा मतप्रवाह पक्षात असल्याने पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या नावाला रेड सिग्नल दाखविल्याची माहिती आहे. परिणामी मुख्यमंत्र्यांच्या यात्रेच्या सभेत गड्डमवारांचा पक्ष प्रवेश होऊ शकला नाही.

अनेक वर्षे मंत्री राहिलेले काँग्रेसचे दिवंगत नेते वामनराव गड्डमवार यांचे संदीप गड्डमवार हे चिरजीव आहेत. घरातच राजकारणाचे बाळकडू मिळाल्यानंतरही आणि वडिलांना मानणारा मोठा वर्ग असूनही संदीप गड्डमवार यांना राजकारणात जम बसविता आला नाही. २००९ मध्ये ब्रम्हपुरीतून काँग्रेसने गडचिरोलीचे युवा नेते पंकज गुड्डेवार यांना रिंगणात उतरविले होते. त्यावेळी संदीप गड्डमवार यांनी वडेट्टीवारांची आतून मदत घेऊन अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती. परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी २०१४ मध्ये तुम्हालाच तिकिट मिळेल, असे आश्वासन वडेट्टीवारांनी गड्डमवार यांना दिले होते. मात्र, झाले उलटेच. विजय वडेट्टीवार यांनी स्वत: ब्रम्हपुरीतून काँग्रेसपक्षातर्फे निवडणूक लढविली आणि गड्डमवारांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून रिंगणात उतरावे लागले होते. म्हणजे, काँग्रेस, अपक्ष, राष्ट्रवादी कॉग्रेस असा प्रवास करुन आल्यानंतर आता गड्डमवार हे भाजपात जाण्याच्या तयारीत होते. मात्र गड्डमवारांचा राजकीय प्रवास बघता भाजप कार्यकर्त्यानी त्यांची वाट अडवून धरली आहे. यावरुन वसंत वारजूरकर हेच भाजपचे ब्रम्हपुरीतील उमेदवार असतील, यावर कार्यकर्त्याचे एकमत होताना दिसत आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
848DH
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना