शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

मानव विकास मिशनच्या बसेस रामभरोसे; विद्यार्थ्यांची ससेहोलपट

Friday, 2nd August 2019 12:44:19 AM

आलापल्ली,ता.२: विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या मानव विकास मिशनच्या बसेसच विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण करीत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.

विशेषत: दक्षिण भागात हा प्रकार अधिक प्रमाणात दिसून येत आहे. आलापल्ली हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने एटापल्ली व भामरागड मार्गावरील अनेक गावांतील विद्यार्थी मानव विकास मिशनच्या बसेसने तेथील शाळेत ये-जा करीत असतात. परंतु अनेकदा बसेस वेळेवर येत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्याची गैरसोय होते.

३१ जुलैला आलापल्ली बस स्थानकावर अनेक शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी संध्याकाळी पावणेपाच वाजता आपल्या गावी जाण्यासाठी आले. ५.१० वाजता एटापल्लीकडे जाणारी नियोजित बस होती. ही बस अहेरी स्थानकावरुन सोडण्यात येते. परंतु दोन तास होऊनही बस येईना. त्यामुळे शाळेचे शिक्षक व मुख्याध्यापकही विद्यार्थी कसे जातील, या चिंतेने बस स्थानकावर आले. शेवटी ७.१५ वाजता दुसऱ्या बसने विद्यार्थ्याना रवाना करण्यात आले. बसेसच्या वेळा ठरलेल्या आहेत. परंतु त्या कधीच वेळेवर येत नाही. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्याना शाळेला बुट्टी मारावी लागते. ५.१० वाजताची बस असल्याने आलापल्लीतील शाळांना ४.४५ वाजता सुटी दिली जाते. परंतु बसेस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांची ससेहोलपट होत आहे.

अहेरी, एटापल्ली व भामरागड तालुके नक्षलग्रस्त असून, सध्या नक्षल्यांचा शहीद सप्ताह सुरु आहे. शिवाय मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशावेळी वेळेवर बस न आल्यास आणि विद्यार्थ्याच्या जीवाला धोका झाल्यास जबाबदार कोण राहील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्हा प्रशासनाने परिवहन महामंडळाला यासंदर्भात सक्त ताकीद द्यावी, अशी मागणी केली जात आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
K33ZL
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना