शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

मुख्याधिकाऱ्यास मारहाणप्रकरणी दोन माजी नगरसेवकांना ५ वर्षांचा सश्रम कारावास

Sunday, 16th June 2019 12:38:26 AM

गडचिरोली,ता.१५: नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्याच्या शासकीय निवासस्थानाची तोडफोस करुन त्यांच्या नातेवाईकांना मारहाण केल्याप्रकरणी येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी एका विद्यमान व एका माजी नगरसेवकास प्रत्येकी ५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. प्रा.रमेश श्रीहरी चौधरी(४५) व प्रा.राजेश केशवराव कात्रटवार(५०) अशी दोषींची नावे असून, ते गडचिरोली येथील रहिवासी आहेत.

१९ ऑगस्ट २०१० रोजी गडचिरोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक इंगोले हे आपल्या शासकीय निवासस्थानी असताना तत्कालिन नगरसेवक प्रा.रमेश चौधरी व प्रा.राजेश कात्रटवार यांनी लोखंडी प्रवेशद्वार तोडून निवासस्थानी प्रवेश केला. त्यानंतर खिडक्या व दरवाजांची नासधूस केली. याबाबत मुख्याधिकारी श्री.इंगोले यांनी हटकले असता, आरोपींनी त्यांना शिवीगाळ करुन मारहाण करण्याची धमकी दिली. तसेच त्यांचे वडील व मेहुण्यास मारहाण केली. 

याबाबत इंगोले यांच्या तक्रारीवरुन गडचिरोली पोलिसांनी प्रा.रमेश चौधरी व प्रा.राजेश कात्रटवार यांच्यावर भादंवि कलम ३२३, ४५२, ५०६, ३४ तसेच ३,४ शासकीय मालमत्ता नुकसान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस उपनिरीक्षक भगवान वडतकर यांनी गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

आज या प्रकरणाचा निकाल लागला. मुख्य न्यायदंडाधिकारी बी.एम.पाटील यांनी रमेश चौधरी व राजेश कात्रटवार यांना भादंवि कलम ३२३, ३४ अन्वये प्रत्येकी १ वर्षाचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस साधा कारावास, कलम ४५७,३४ अन्वये प्रत्येकी ५ वर्षांचा सश्रम कारावास व ५ हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास एक महिन्याचा साधा कारावास, तसेच सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायदा कलम ३, ४ अन्वये प्रत्येकी ५ वर्षांचा साधा कारावास व ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.

सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील योगीता राऊत यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हवालदार यशवंत मलगाम व सुभाष सोरते यांनी काम पाहिले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
G9V44
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना