मंगळवार, 23 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गडचिरोली जिल्हा सहकारी बँकेतून थेट एलपीजी सबसिडी सुविधा मिळणार

Wednesday, 12th November 2014 05:37:05 AM

 
गडचिरोली, ता़१२
एलपीजी सबसिडी सुविधा देण्याच्या योजनेस केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनाही या सुविधेचा लाभ मिळणार असून, गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आता थेट बँकेतून ही सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे़ १ जानेवारी २०१५ पासून नागरिकांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे़
केंद्र शासनाने यापूर्वी आधार कार्ड संलग्नीत एलपीजी गॅसवरील अनुदान ग्राहकांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याची योजना देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू केली होती़ परंतु बर्‍याच ग्राहकांकडे आधार कार्ड नसल्याने शासनाने या योजनेला स्थगिती दिली होती़ परंतु अलिकडेच केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने १५ नोव्हेंबरपासून देशातील ५४ निवडक जिल्ह्यांमधून ही योजना पुन्हा सुरू केली असून, १ जानेवारी २०१५ पासून तिची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार आहे़ या योजनेत दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचाही समावेश आहे़ या योजनेचा लाभ घेण्यासाठी गॅसधारकाकडे त्याचा आधार क्रमांक असणे बंधनकारक नाही़ आधार कार्ड असल्यास तो क्रमांक सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत व एलपीजी वितरकाकडे द्यावा़ ज्या ग्राहकांकडे आधार क्रमांक नाही, त्यांनी बँकेच्या खाते क्रमांकाची माहिती एलपीजी वितरकाकडे द्यावी, ज्यांनी आधीच आपल्या आधार क्रमांकांद्वारे सबसिडी योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांना पुन्हा नोंद करण्याची आवश्यकता नाही, असे बँकेने स्पष्ट केले आहे़
केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सूचीत राज्यातील ठाणे, रायगड व गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या तीनच सहकारी बँकांचा समावेश असून, गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही विदर्भातील पहिली बँक आहे़ या बँकेकडे ३ लाख ७० हजार ग्राहकांचे खाते असून, ५४ शाखांमधून ग्राहकांना एलपीजी सबसिडी सुविधेचा लाभ मिळणार आहे़ त्यासाठी ग्राहकांनी नजीकच्या बँक शाखेत व गॅस वितरकाकडे नोंद करावी, असे आवाहन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी केले आहे़ 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
ONAS5
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना