शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

जांभुळखेड्याच्या भूसुरुंगस्फोटास जबाबदार एसडीपीओवर गुन्हा दाखल करा-शहीद जवानांच्या पत्नींची मागणी

Friday, 17th May 2019 08:37:40 AM

गडचिरोली, ता.१७: कुरखेड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे यांच्या चुकीमुळेच आमच्या शूर पतींना प्राण गमवावे लागले. त्यामुळे काळे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जांभुळखेडा गावाजवळ झालेल्या भूसुरुंगस्फोटातील १५ शहीद जवानांच्या पत्नींनी आज पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन केली.

१ मे रोजी कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा गावाजवळ नक्षल्यांनी केलेल्या भूसुरुंगस्फोटात १५ जवान व एक खासगी इसम शहीद झाले. काल जवळपास सर्वच शहीद जवानांच्या वीरपत्नी गडचिरोलीत दाखल झाल्या. आज त्यांनी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे कैफियत मांडली. त्यांनी सांगितले की, शहीद जवान शीघ्र कृती दलात कार्यरत होते. परंतु अनेक दिवसांपासून या दलाला कमांडर नव्हता, याचे कारण पुढे आले पाहिजे. नक्षल्यांनी एखादे हिंसक कृत्य केल्यानंतर घटनास्थळी पोहचण्यासाठी जवान तत्पर असतात. परंतु तेथे जाण्यापूर्वी रोड ओपनिंग केली जाते. तसेच अन्य दक्षताही घेतली जाते. परंतु उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे यांनी रोड ओपनिंग न करताच जवानांना पाचारण केले. त्यांच्या अक्षम्य चुकीमुळेच आमच्या पतीला प्राण गमवावा लागला. नक्षल्यांशी लढताना त्यांना वीरमरण आले असते तर दु:ख झाले नसते. परंतु पोलिस अधिकाऱ्याच्या चुकीमुळे त्यांचा जीव गेला. त्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वीरपत्नींनी आज केली. 

उच्चस्तरीय चौकशी समिती गठित:पोलिस अधीक्षक

जांभुळखेडा भूसुरुंगस्फोटाबाबत उच्चस्तरीय चौकशी समिती गठित करण्यात आली असून, या समितीची चौकशी जवळपास पूर्ण होत आली आहे. समितीच्या अहवालानंतर दोषी अधिकाऱ्यावर निश्चितपणे कारवाई केली जाणार आहे. शिवाय मुख्यमंत्री व पोलिस महासंचालक या प्रकरणाकडे जातीने लक्ष ठेवून आहेत, असे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी वीरपत्नींना सांगितले. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
LS1LE
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना