शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

चार कलमी कार्यक्रमातून गावाची दारूबंदी साध्य: डॉ.अभय बंग यांचे प्रतिपादन

Saturday, 11th May 2019 11:53:02 PM

गडचिरोली,ता.१२: २०१६ पासून जिल्ह्यातील १५०० गावे दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी 'मुक्तिपथ' हा पथदर्शी कार्यक्रम 'सर्च' व राज्यशासनाच्या सहकार्यातून सुरू करण्यात आला आहे. यांतर्गत व्यापक जनजागृती, गाव पातळीवर सक्रीय संघटन, कायद्याची अंमलबजावणी करून बेकायदेशीर दारू व तंबाखूला बंदी आणि व्यसनी रुग्णांवर उपचार या चार कलमी कार्यक्रमांतून दारू आणि तंबाखूमुक्तीसाठी प्रयत्न केले जात आहेत. यात अनेक अडचणी आणि संकटे येत असली;तरी यावर मात करून संघटनेची ताकद विक्रेत्यांना दाखवून देत गावाची दारूबंदी तुम्हीच साध्य करू शकता, असा आशावाद डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केला.

देसाईगंज येथील 'मुक्तिपथ' तालुका कार्यालयाद्वारे आयोजित व्यसनमुक्ती संमेलनात ते बोलत होते. चार कलमी कार्यक्रमांचाच आधार घेत तालुक्यातील गावे दारूबंदीसाठी प्रयत्न करीत आहेत. अनेक गावांनी दारूबंदी सध्य केली आहे, तर काही या मार्गावर आहेत. या सर्व गाव संघटनांना येणाऱ्या अडचणी, आव्हाने आणि मिळालेले यश इतर गावांना कळावे आणि चर्चात्मक पद्धतीने दारूबंदीसाठी मार्ग काढता यावा यासाठी हे संमेलन घेण्यात आले. संमेलनाला ३० गावातील संघटनेचे सदस्य उपस्थित होते. सर्वप्रथम देसाईगंज तालुक्यातील दारूमुक्ती आंदोलनाचा आढावा घेताना डॉ. बंग म्हणाले, देसाईगंज हा सुरुवातीपासूनच जागरूक तालुका राहिला आहे. लढाऊ कार्यकर्ते ही या तालुक्याची ओळख आहे. १९८७ पासून जिल्ह्यात सुरु झालेल्या दारूमुक्ती आंदोलनात सर्वात सक्रीय देसाईगंज तालुका होता. बेकायदेशीर दारूविक्री तालुक्यात तेव्हाही होती, आजही आहे. पण, 'गावाची दारूबंदी' या आंदोलनात सहभागी होत अनेक गावांनी दारूबंदी साध्य केली होती. आजही यातील बहुतेक गावांनी ती टिकवून ठेवली आहे. आज गावांच्या साथीला मुक्तिपथ भक्कमपणे उभे आहे. गाव पातळीवर संघटना दारूविक्रेत्यांना सळो की पळो करून सोडत आहे. असंख्य अडचणीतून मार्ग काढत आहेत. याच प्रयत्नांतून दारूमुक्ती नक्कीच साध्य होईल, असेही ते यावेळी म्हणाले.

उपस्थित गाव संघटनेच्या सदस्यांनी गावातील दारू बंद करताना आलेले अनुभव विशद केले. काही गावांत अद्यापही पूर्ण दारूबंदी साध्य झालेली नाही. महिला प्रयत्नशील आहेत. पण विक्रेते ऐकत नसल्याने अपयश येत असल्याचेही अनेक महिलांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले. यावर आवश्यक उपायही डॉ. बंग यांनी सुचविले. दारूबंदी हा एक दिवसाचा कार्यक्रम नाही. पीक येण्यासाठी शेती आपल्याला दरवर्षी कसावी लागते. जेवणही आपण रोज करतो. तसेच दारूबंदीचे आहे. ती सातत्याने करावी लागणार आहे आणि त्यासाठी तयारही राहावे लागणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. मुक्तिपथ चे संचालक मयूर गुप्ता यांनी दारूबंदीसाठी आवश्यक उपाययोजना करताना गावांनी संघटीत राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. दारूविकेते मुजोर झाले आहे. पण चार कलमी कार्यक्रमाचा योग्य वापर केल्यास त्यांच्या मुजोरीला आवर घालून गावाला दारूमुक्त करणे शक्य असल्याचे ते यावेळी म्हणाले. संमेलनाच्या आयोजनासाठी मुक्तिपथचे उपसंचालक संतोष सावळकर, तालुका संघटक भारती उपाध्ये, उपसंघटक राकेश खेवले यांच्यासह इतरही कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

कायदेशीर कारवाईसाठी प्रयत्न आवश्यक

गाव संघटनेचे सदस्य दारू पकडतात. पोलिसांच्या स्वाधीन करतात. पण सदोष पंचनामा, साक्षीदार आणि पंचांनी समन्सकडे केलेले दुर्लक्ष यासह इतरही बाबींमुळे केसेस दुबळ्या होत जातात. त्यातच कायदेशीर कारवाई वेळखाऊ असल्याने अनेकदा निराशा येते. पण या सर्व बाबी समजून घेत दारूविक्रेत्यांविरोधातील कायदेशीर तक्रारी बळकट करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींवर ॲड. अभिता वासनिक यांनी गाव संघटनांना मार्गदर्शन केले. कुणाच्याही दबावाला बळी न पडता थेट साक्ष देण्याची गरजही त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितली.  


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
VLU6V
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना