गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

.....अन् लग्नमंडपातच टाकला मतदान कर्मचाऱ्यांनी डेरा!

Friday, 12th April 2019 02:49:19 AM

नंदकिशोर वैरागडे/कोरची, ता.१२: लोकसभा निवडणुकीसाठी नागरिक सज्ज असताना नक्षल्यांच्या भीतीने ऐनवेळी मतदान केंद्रे बदलण्याची पाळी जिल्हा प्रशासनावर आली. कोरची तालुक्यातील सावली येथील मतदान केंद्र चक्क एका लग्न मंडपात हलविण्यात आले आणि जेथे शुभमंगल झाले; तेथेच लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सवही साजरा झाला.

काल ११ एप्रिलला गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रासाठी निवडणूक झाली. त्यासाठी कोरची तालुक्यातील जनता व प्रशासनही सज्ज झाले होते. कोरची तालुका नक्षलग्रस्त असून, येथील ४० पैकी ३५ मतदान केंद्र अतिसंवेदनशील आहेत. याच तालुक्यातील भिमनखुजी मतदान केंद्रावर हेलिकॉप्टरने मतदान पथक पाठविण्यात आले. परंतु हे केंद्र अतिसंवेदनशील असल्यामुळे सुरक्षेच्या कारणावरून तेथून १५ किलोमीटर अंतरावरील गॅरापत्ती येथे ते हलविण्यात आले. नाडेकल येथील मतदान केंद्र १४ किलोमीटर अंतरावरील ढोलडोंगरी येथे स्थानांतरीत करण्यात आले. लेकुरबोळीचे केंद्र ३ किलोमीटरवरील नवेझरी येथे नेण्यात आले. अलोंडी येथील मतदान केंद्र ५ किलोमीटर अंतरावरील पिटेसुर येथे हलविण्यात आले. गोडरीचे केंद्र ७ किलोमीटर अंतरावरील सोनपूर येथे नेण्यात आले. मात्र, प्रशासनाने मतदारांना नवीन केंद्रावर नेण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था न केल्याने त्यांना भर उन्हात प्रचंड त्रास सहन करावा लागला. कैमुल येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील केंद्र सुदाराम मेश्राम यांच्या घरी हलविण्यात आले. कैमुल येथील व्हीव्हीपँट मशीन बंद पडल्यामुळे मतदान सकाळी ८.३० वा.सुरू झाले. झोनल आफिसर टिचकुले आले आणि त्यांनी मशीन सुरु करुन दिली. कोरची तालुक्यातील कोटरा येथील जिल्हा परिषद शाळेत असलेल्या मतदान केंद्रावर संरक्षण भिंत नसल्याने मतदान केंद्रावर रांगेत उभे राहून मतदान करण्यासाठी गेलेल्या सुमारे २५० मतदाराना उशिर झाला म्हणून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हाकलून दिल्याने मतदानापासुन वंचित राहावे लागले. रांगेत उभे असलेल्या सर्व मतदारांना मतदान करु देणे अपेक्षित असताना मतदान करु न दिल्याने मतदारांनी प्रशासना विरोधात रोष व्यक्त केला.

 

सावली येथे मात्र वेगळेच घडले. तेथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मतदान केंद्र प्रभुदास लाडे यांच्या घरी हलविण्यात आले. लाडे यांच्या भाचीचे लग्न १५ दिवसांपूर्वीच झाले. त्याच्या अंगणातील लग्न मंडपात मतदान केंद्र थाटण्यात आले. ज्या ठिकाणी नवरीला हळद लागली; तेथेच बोटाला शाई लावण्याचा सुखद अनुभव मतदारांनी घेतला. इतर गावकऱ्यांनीही याच मंडपात मतदान केले. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव हे केंद्र हलविण्यात आले खरे; पण मंडपात कोणती सुरक्षा होती, हा यक्षप्रश्न मतदार विचारत होते.  


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
V9M1E
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना