शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

ग्रामसेविकेसह सरपंच व उपसरंपचही एसीबीच्या जाळ्यात

Tuesday, 9th April 2019 12:35:25 AM

गडचिरोली, ता.८: एका शैक्षणिक संस्थेला शासकीय जमीन अदा करण्याकरिता ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन तो मंजूर करण्याच्या कामाकरिता संबंधित संस्थेच्या प्रमुखाकडून ९० हजार रुपयांची लाच मागताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज गडचिरोली तालुक्यातील खरपुंडी ग्रामपंचायतीची ग्रामसेविका, सरपंच व उपसरपंचास अटक केली. अर्चना बाळासाहेब श्रीगिरीवार(४६)(ग्रामसेविका), आनंदराव दादाजी नैताम(४६)(सरपंच) व कमलेश अशोक खोब्रागडे(२९)(उपसरपंच), अशी आरोपीची नावे आहेत.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ता हा राजर्षि शाहू महाराज शैक्षणिक संस्थेचा प्रमुख असून, त्याला शैक्षणिक कामाकरिता खरपुंडी येथील शासकीय जमीन हवी होती. त्यासाठी जमिनीचे भोगवटा मूल्य भरुन जमीन अदा करण्याचा ठराव घेऊन तो मंजूर करण्यासाठी ग्रामसेविका अर्चना बाळासाहेब श्रीगिरीवार, सरपंच आनंदराव दादाजी नैताम व उपसरपंच कमलेश अशोक खोब्रागडे यांनी तक्रारदारास प्रत्येकी ५० हजार अशा एकूण दीड लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती ते १ लाख २० हजार रुपये(ग्रामसेविका ४० हजार रुपये, सरपंच ५० हजार रुपये व उपसरपंच ३० हजार रुपये) स्वीकारण्यास तयार झाले.

मात्र, लाच देण्याची तक्रारकर्त्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने गडचिरोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. 

त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आज सापळा रचून तक्रारकर्त्याकडून पहिला हप्ता म्हणून ९० हजार रुपयांची(ग्रामसेविका ४० हजार रुपये, सरपंच २५ हजार रुपये व उपसरपंच २५ हजार रुपये) लाच मागताना तिघांनाही पकडले. तिघांवरही गडचिरोली पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसीबीचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुधलवार, उपअधीक्षक विजय माहुलकर, डी.एम.घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रवी राजुलवार, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, हवालदार प्रमोद ढोरे, नथ्थू धोटे, सतीश कत्तीवार, सुधाकर दंडिकवार, देवेंद्र लोनबले, गणेश वासेकर, महेश कुकुडकर, किशोर ठाकूर, सोनी तावाडे, सोनल आत्राम व तुळशीराम नवघरे, घनश्याम वडेट्टीवार आदींनी ही कारवाई केली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
XILLW
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना