गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

दुष्काळाच्या झळा: आदिवासींना करावी लागली २० लोकांची एकत्र तेरवी

Wednesday, 20th March 2019 01:37:27 AM

नंदकिशोर वैरागडे/कोरची: दुष्काळाच्या झळा असह्य झाल्याने शेतकरी आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवीत असल्याच्या घटना दररोज कुठे ना कुठे घडत असतात. मात्र, मरणानंतरही या दुष्काळाने त्यांच्या कुटुंबीयांचा छळ थांबविलेला नाही. आर्थिक स्थिती हलाखीची झाल्याने वैयक्तिरित्या तेरवी करु न शकणाऱ्या तब्बल १२ कुटुंबीयांना आधार देत पड्यालजोग ग्रामसभेने मृत्युमुखी पडलेल्यांची तेरवी साजरी केली.

आदिवासी संस्कृतीप्रमाणे निधन झालेल्या व्यक्तीची तेरवी दोन-तीन वर्षानंतर शेतीतून चांगले उत्पादन मिळाल्यानंतर करण्याची प्रथा आहे. परंतु गेल्या पाच वर्षापासून दुष्काळाच्या छायेत वावरणाऱ्या कोरची तालुक्यातील आदिवासी बांधवांना वैयक्तिकरित्या तेरवी करणे शक्य झाले नाही. त्यामुळे पड्यालजोग ग्रामसभेने पुढाकार घेऊन २० लोकांची तेरवी सामूहिकरित्या पार पाडण्याचा चंग बांधला. 

प्रत्येक कुटुंबाने तेरवी साजरी करायचा विचार केला, तर प्रत्येकी तीन दिवस लागतात. एकूण १२ परिवारांतील मृतांच्या तेरवीसाठी ३६ दिवस लागले असते आणि खर्चही अवाढव्य आला असता. आदिवासी परंपरेनुसार, गावात कोणत्याही एका कुटुंबात कार्यक्रम झाला तर संपूर्ण गावातील नागरिक काम बंद ठेवतात आणि सर्वांनाच भोजनाचे निमंत्रण असते. शिवाय एक दिवस काम बंद ठेवावे लागत असल्याने गावकऱ्यांचेही नुकसान होते. संबंधित कुटुंबीयांची परिस्थिती हलाखीची असल्याने ते तेरवी करु शकत नसल्याची बाब ग्रामसभेतील चर्चेदरम्यान लक्षात आली. लगेच ग्रामसभेने सामूहिक तेरवी करण्याचा निर्णय घेतला. 

त्यासाठी पड्यालजोग ग्रामसभेने बाराही परिवारांकडून त्यांना झेपेल तेवढी वर्गणी गोळा केली. उर्वरित पैसे आणि धान्य गावकऱ्यांनी गोळा केले आणि अनेक वर्षांपासून स्थगित असलेला तेरवीचा कार्यक्रम १७ व १८ मार्च अशा दोन दिवसांत उरकला 

पहिल्या दिवशी जळंगे नाचाने पाहुण्यांचे मनोरंजन झाले, दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी श्रमदानाने सर्व वीसही लोकांच्या समाधी तयार केल्या आणि सामूहिक भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. दुष्काळामुळे केवळ सामूहिक विवाह सोहळेच नव्हे; तर आता सामूहिक तेरवीचेही कार्यक्रम घेण्याची वेळ नागरिकांवर येऊ लागली आहे. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
R8T1A
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना