गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज:जिल्हाधिकारी शेखर सिंह

Monday, 11th March 2019 06:39:09 AM

गडचिरोली, ता.११: लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असून, आचारसंहितेचा भंग होऊ नये याबरोबरच नवीन मतदार नोंदणी, दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा व ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.विजय राठोड, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री.नान्हे, जिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना नीळ पत्रकार परिषदेला उपस्थित होते. शेखर सिंह यांनी सांगितले की, १८ मार्चला अधिसूचना जारी झाल्यापासून २५ मार्चपर्यंत सकाळी ११ ते ३ वाजतापर्यंत उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. २६ मार्चला नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. २८ मार्च ही नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम तारीख असेल. मतदान ११ एप्रिलला होईल. मात्र, मतदान सकाळी ७ वाजतापासून दुपारी ३ वाजतापर्यंत कोणत्या मतदारसंघात आणि संध्याकाळी ५ वाजतापर्यंत कोणत्या मतदारसंघात घ्यायचे, याविषयी लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्री.सिंह यांनी स्पष्ट केले.

आतापर्यंत सार्वजनिक उत्सव, सार्वजनिक कार्यक्रम, यात्रा व अन्य ठिकाणी प्रशासनाने मतदानाबाबत जागृती केल्याचे सांगून श्री.सिंह यांनी नवीन मतदार नोंदणीसाठी ६ क्रमांकाचा अर्ज भरण्याची मुदत १५ मार्चपर्यंत असल्याचे सांगितले. आपले नाव मतदार यादीत आहे कि नाही, हे १९५० या क्रमांकावर तपासून पाहता येईल. तसेच मतदानासाठी ११ पैकी कोणतेही एक ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. मतदानाच्या दिवशी सकाळी ६ वाजता उमेदवारांच्या प्रतिनिधींना मतदान केंद्रांवर बोलावून मॉक पोल घेण्यात येईल. याद्वारे संबंधित ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची विश्वसनीयता तपासता येईल, असे श्री.सिंह यांनी सांगितले. जिल्ह्यात दोन हजार दिव्यांग मतदार आहेत. ज्यांना चालता येत नाही असे लोक, गरोदर माता व वृद्धांसाठी ग्रामपंचायतीमार्फत व्हील चेअर पुरविली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करणार

निवडणूक आयोगाने तयार केलेल्या आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याबाबत प्रशासन कडक पावले उचलत आहे. निवडणूक प्रचारादरम्यान रात्री १० ते सकाळी ६ वाजतापर्यंत लाऊडस्पीकरचा वापर करता येणार नाही

यंदा १५ लाख ६८ हजार ६२० मतदार

यंदाच्या निवडणुकीत १५ लाख ६८ हजार ६२० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात पुरुष मतदारांची संख्या ७ लाख ९४ हजार ७६८, तर स्त्रियांची संख्या  ७ लाख ७३ हजार ८५० एवढी असणार आहेत. २०१४ च्या निवडणुकीच्या तुलनेत एकट्या गडचिरोली जिल्ह्यात ३१ जानेवारी २०१९ पर्यंत ४१६३० मतदारांची वाढ झाली आहे.

पोलिस प्रशासन सतर्क: पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे

लोकसभा निवडणुकीसाठी पोलिस प्रशासनही सज्ज झाले आहे. २००४ व २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काही अनुचित घडल्या होत्या. निवडणुकीदरम्यान नक्षलवादी मतदारांना भीती दाखवून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. मात्र, यंदा पोलिस प्रशासन नक्षल्यांचे मनसुबे हाणून पाडेल, असे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले. यावर्षी अतिसंवेदनशिल व संवेदनशिल मतदान केंद्रांच्या संख्येत ३३ ने घट झाल्याची माहितीही श्री.बलकवडे यांनी दिली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
1PFV4
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना