गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

मोदींच्या सभेमुळे शहीद जवांनाचे पार्थिव उशिरा पोहचले;मग ते देशभक्त कसे?:आ.विजय वडेट्टीवार

Sunday, 3rd March 2019 06:19:38 AM

आलापल्ली, ता.३:पुलवामा हल्ल्यात ४३ जवान शहीद झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात प्रचारसभा घेत होते. पंतप्रधानांचे हेलिकॉप्टर जात असताना दुसऱ्या कोणत्याही हेलिकॉप्टरला त्या मार्गाने जाता येत नाही. त्यांच्यामुळेच शहिदांचे पार्थिव त्यांच्या घरापर्यंत पोहचण्यास विलंब झाला. मग, पंतप्रधान आणि भाजपवाले देशभक्त कसे, असा खडा सवाल काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व विधिमंडळ उपनेते आ.विजय वडेट्टीवार यांनी आज येथे केला.

अहेरी उपविभागातील कार्यकर्त्यांचा मेळावा आज आलापल्ली येथे आयोजित करण्यात आला होता, यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, काँग्रेसचे आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार आनंदराव गेडाम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, डॉ.नितीन कोडवते, डॉ.नामदेव किरसान, माजी आमदार पेंटारामा तलांडी, सगुणा तलांडी, युकाँचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, हसन गिलानी, समशेर पठाण, यशवंत दोंतुलवार, जिल्हा परिषद सदस्य संजय चरडुके, रवींद्र शहा, रहीम भाई, मुश्ताक हकीम, बंडू आत्राम उपस्थित होते.

आ.विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले, देश इंग्रजांच्या ताब्यात होता तेव्हा एकही भाजपवाला स्वातंत्र्याच्या लढाईत नव्हता. इंग्रजांची चापलुसी करणारे हे लोक आहेत. देशात जेव्हा सुई तयार होत नव्हती; तेव्हा काँग्रेसने अग्निी ब्रम्हास्त्र तयार केले. म्हणून हा देश सुरक्षित आहे. काँग्रेसचे सरकार असताना भाजपवाले पंतप्रधानांचा राजीनामा मागायचे. आता मोदी राजीनामा का देत नाही, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.

पुलवामा हल्ल्यात साडेतीनशे किलो स्फोटकांचा वापर झाला. तेव्हा मोदी आणि भाजपवाले झोपले होते का. देश सैनिकांनी सुरक्षित ठेवला आहे. परंतु हे स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. आंतरराष्ट्रीय करारामुळे व संपूर्ण देशवासी 'अभिनंदन'च्या पाठिशी राहिल्याने ते सुटले, मोदींमुळे नाही, अशी टीकाही त्यांनी केली. पुलवामा हल्ल्यातील शहिदांचे पार्थिव देह मोदींच्या प्रचारसभेमुळे उशिरा पोहचले, मग, हे कसले देशभक्त, असा संतप्त सवालही श्री.वडेट्टीवार यांनी केला.

दोन कोटी बेरोजगारांना रोजगार मिळाला नाही. गॅस सिलिंडरचे भाव वाढवले. गॅस दिल्यानंतर रॉकेल बंद केला. काँग्रेस पक्ष संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींना ६०० रुपये देत होता.. तेव्हा भाजपवाल्यांनी दोन हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. आता पैसेच मिळत नाही, असे वडेट्टीवार म्हणाले. साखर, तेलाचेही भाव वाढविले. आदिवासींच्या हक्कामधून धनगरांना सवलती देता येणार नाही, असे ठणकावत श्री.वडेट्टीवार यांनी अहेरी उपविभागातील घरकुल लाभार्थींना यंदा दुसरा हप्ता मिळाला नाही, तसेच ओबीसी, दलितांची शिष्यवृत्ती बंद केल्याने विद्यार्थी अडचणीत आल्याचे सांगितले.

प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, विविध योजनांच्या माध्यमातून काँग्रेसने दलित, आदिवासींच्या उत्थानाचे काम केले. परंतु भाजप सरकारने लोकांना मुर्ख बनवलं. प्रचंड महागाई वाढवली. राहुल गांधींनी छत्तीसगडमध्ये दोन दिवसांत धानाला अडीच हजार रुपये भाव देऊन कर्जमाफी दिली. मोदी सरकारने छत्तीसगडमध्ये अदानी, अंबानीला दिलेल्या जमिनी परत शेतकऱ्यांना मिळवून देण्याचे काम राहुल गांधींनी केले. पाकिस्तानला नामोहरम करण्याचे काम इंदिरा गांधी आणि राजीव गांधींनी केले. त्यामुळे पाकिस्तानचा धडा शिकविण्याचे श्रेय मोदींना जात नाही, असे श्री.लोंढे म्हणाले.

याप्रसंगी माजी आमदार आनंदराव गेडाम म्हणाले की, जे लोक वारंवार फसवतात, त्यांना घरचा रस्ता दाखविण्याची वेळ आली आहे. आज लोक जमिनीच्या पट्टे मिळावे म्हणून सरकारला जाब विचारताहेत. परंतु सरकार त्यांना काहीही द्यायला तयार नाही. धान खरेदी केंद्रांची अवस्था वाईट आहे. दीडपट भाव देण्याची घोषणा हवेत विरली. त्यामुळे सरकारला खाली खेचावं, असे आवाहन श्री.गेडाम यांनी केले. जिल्हाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी यांनीही सरकारवर टीका केली. लोकांवर अन्याय होत असताना जिल्ह्याचे पालकमंत्री झोपून असतात, अशी टीका त्यांनी केली.

डॉ.नितीन कोडवते यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे आदिवासींना त्यांचे घर व जमिनीपासून वंचित ठेवण्याचे काम केले. भाजप सरकार हे दलित, आदिवासी व बहुजनविरोधी असून, या सरकारच्या काळात सर्व जीवनावश्यक वस्तुंचे भाव वाढले. परंतु सरकारने धानाचे भाव वाढवले नाही. छत्तीसगड, मध्यप्रदेश व राजस्थानमध्ये धानाला चांगला भाव आहे. या प्रदेशांमध्ये काँग्रेस सरकारने सत्तेवर येताच दहा दिवसांत कर्जमाफी केली, असे डॉ.कोडवते म्हणाले.

अॅड.राम मेश्राम यांनी देशातील जनतेला केवळ काँग्रेसच न्याय देऊ शकते, असे सांगितले. काँग्रेसकडे तीन-तीन डॉक्टर उमेदवारी मागत आहेत. ज्यांना तिकिट मिळेल, त्यांच्या पाठीशी काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहावं, असे आवाहन अॅड.मेश्राम यांनी केले.

याप्रसंगी पाच तालुकाध्यक्षांनी विधिमंडळ उपनेते आ.विजय वडेट्टीवार,  प्रवक्ते अतुल लोंढे व जिल्हाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी यांचा सत्कार केला. संजय चरडुके यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4PMF4
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना