शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

सध्याचे सरकार हे भूमिपूजन स्पेशालिस्ट सरकार-युकाँ प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांची टीका

Sunday, 24th February 2019 06:30:12 AM

गडचिरोली, ता.२४: भाजप सरकारने स्वत: एकही काम केले नसून, काँग्रेसने केलेल्या कामांचेच उद्घाटन करण्याचे काम भाजपचे मंत्री करीत आहेत. आयत्या बिळावर नागोबा असे हे सरकार भूमिपूजन स्पेशालिस्ट सरकार आहे, अशी टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आज येथे केली.

'चलो पंचायत अभियान' राबविण्यासाठी आज सत्यजित तांबे गडचिरोली जिल्ह्यात आले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी उपरोक्त टीका केली. यावेळी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव शिवाणी वडेट्टीवार, अजित सिंह, विश्वजित कोवासे, युकाँचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, लॉरेंस गेडाम, डॉ.चंदा कोडवते, अतुल मल्लेलवार, समशेर खॉ पठाण यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

सुरुवातीला सत्यजित तांबे यांनी चलो पंचायत अभियानाची माहिती दिली. या अभियानांतर्गत युवक काँगेस पाच कलमी कार्यक्रम राबवीत असून, बेरोजगारांना युवा शक्ती कार्ड देण्यात येत आहेत. राज्यात आतापर्यंत साडेचार हजार कार्यक्रम झाले असून, आचारसंहिता लागू होईपर्यंत हे अभियान सुरुच राहील. त्यानंतर चलो वॉर्ड अभियान व पुढे चलो घर घर अभियान राबविण्यात येणार असल्याचे श्री.तांबे यांनी सांगितले.

२०१४ च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु एनएसएसओच्या सर्वेक्षणानुसार बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या तर नाहीच; उलट १ कोटी १६ लाख नोकऱ्या कमी झाल्या. जीएसटी, नोटाबंदी यासारख्या निर्णयांमुळे ही परिस्थिती ओढवली. नोकरी नसल्याने शेतकऱ्यांप्रमाणेच बेरोजगारही निराश होऊन आत्महत्या करु लागले असून, ही चिंतेची बाब आहे. बेरोजगार युवकांमध्ये असंतोष असल्याने त्यांचे लक्ष विचलित करुन त्यांना खेळात गुंतवून ठेवण्‍यासाठी सीएम चषक सारखे कार्यक्रम भाजपचे लोक घेत असल्याचा आरोप श्री.तांबे यांनी केला.

बेरोजगारी दूर करण्यासाठी काँग्रेसकडे ठोस कार्यक्रम असून, मध्यप्रदेश, छत्तीसगड व राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार येताच बेरोजगारांना भत्ता देण्यास सुरुवात झाली आहे. तेथील शेतकऱ्यांना चोवीस तासांत सरसकट कर्जमाफी दिली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस या दोन्ही गोष्टी करेल, शिवाय बेरोजगारांना बिनव्याजी १० लाखांपर्यंत कर्ज देऊ, असे सत्यजित तांबे यांनी सांगितले. चलो पंचायत अभियानादरम्यान राफेल घोटाळ्याची माहिती देणे व गावागावात युवक काँग्रेसच्या शाखा उघडण्याचे कामही करण्यात येत असून, त्याला चांगला प्रतिसाद असल्याचे श्री.तांबे यांनी सांगितले. 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष युवकांना किती वाटा देईल, असा प्रश्न विचारला असता सत्यजित तांबे यांनी 'आम्ही वाटा मागणार नाही. मात्र, ज्या युवकाची क्षमता असेल, त्याला तिकिट मिळावी यासाठी पक्षाध्यक्षांपर्यंत नक्की पाठपुरावा करु', असे सांगितले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
040VM
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना