मंगळवार, 19 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

पेंढरी तालुका निर्मितीसाठी ४५ गावांतील ३ हजार नागरिकांनी केले ठिय्या आंदोलन

Wednesday, 20th February 2019 07:51:19 AM

पेंढरी, (ता.धानोरा), ता.२०: धानोरा तालुका मुख्यालयापासून ६५ किलोमीटर अंतरावर असलेले पेंढरी हे गाव व परिसर विकासापासून कोसो दूर असल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे स्वतंत्र पेंढरी तालुक्याची निर्मिती करावी; या मागणीसाठी आज पेंढरी येथे सुमारे ४५ ग्रामसंभामधील ३ हजार नागरिकांनी मुख्य रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात आबालवृदधांसह महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

४५ गावांमधील महिला व पुरुष ढोल, ताशांच्या निनादात आदिवासी नृत्य करीत पेंढरी येथे पोहचले. 'मावा नाटे मावा राज','ना विधानसभा ना लोकसभा, सबसे उँची ग्रामसभा','पेंढरी तालुक्याची निर्मिती झालीच पाहिजे' अशा घोषणा देत हजारो नागरिकांनी पेंढरी-जारावंडी क्रॉसिंगवर ठिय्या आंदोलन केले.

जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास दुल्लमवार, संयुक्त गाव गणराज्य ग्रामसभा परिषदेचे अध्यक्ष देवसाय आतला, माजी पंचायत समिती सभापती रामेश्वरी नरोटे, पंचायत समिती सदस्य रोशनी पवार, माजी सरपंच अरुण शेडमाके, माजी सरपंच बावसू पावे, दुर्गापूरच्या सरपंच मनिषा टेकाम, झाडापापडाच्या सरपंच प्रियंका नाईक, मसरु तुलावी, बारसू दुग्गा, दिनेश टेकाम, छबिलाल बेसरा, रुपेन नाईके यांच्यासह ग्रामसभा, महिला ग्रामसंघाचे प्रतिनिधी व गावकऱ्यांनी या आंदोलनात भाग घेतला.

यावेळी सर्वांनी सांगितले की, धानोरा या तालुका मुख्यालयापासून पेंढरी गावाचे अंतर ६५ किलोमीटर आहे. दळणवळणाची साधने नसल्याने शासकीय कामाकरिता धानोरा येथे गेल्यास मुक्काम करण्याची वेळ येते. २० ते ३० वर्षांपूर्वी झालेला मुख्य रस्ता उखळला असून, त्याची डागडुजी केली जात नाही. दळणवळणाची साधने नाहीत. टीएसपीचा निधी कुठे जिरतो, हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे पेंढरी परिसराच्या विकासाकरिता स्वतंत्र तालुक्याची निर्मिती करावी, अन्यथा २१ ला बाजारपेठ बंद, २२ ला शासकीय कामे बंद, २३ ला तालुकास्थळी मोर्चा, २४ ला जिल्हा मुख्यालयावर मोर्चा, २५ पासून साखळी उपोषण व १ मार्चला जेलभरो आंदोलन करण्यात येईल, शिवाय लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकला जाईल, असा इशारा ग्रामसभांच्या प्रतिनिधींनी दिला. आदिवासी बांधवांना पोलिस नाहक त्रास देत असून, कलम ११० अन्वये नक्षल्यांशी संबंध नसताना आदिवासींना अटक केली जाते. हे कृत्य चुकीचे असून, ग्रामसभांची विचारपूस केल्याशिवाय आदिवासींना अटक करु नये, अशी मागणीही यावेळी सर्वांनी केली.

आंदोलन सुरु असताना दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास धानोरा येथील नायब तहसीलदार श्री.भगत आंदोलनस्थळी आले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करुन मागण्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, मागण्यांसंदर्भात प्रशासनाने तत्काळ पावले उचलली नाही, तर आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला.

नियोजनबद्ध व शांततापूर्ण आंदोलन

आजच्या आंदोलनात ४५ ग्रामसभा व २२ ग्रामपंचायतींमधील स्त्री, पुरुष सहभागी झाले होते. प्रत्येक गावातील नागरिकांनी आंदोलनस्थळी आपापली भोजनाची व्यवस्था स्वतंत्रपणे केली होती. अतिशय शांततेने व नृत्य करीत लोक आंदोलनस्थळी आले. त्यानंतर सर्वांनी शांततेतच आपल्या प्रतिनिधींनी मांडलेले मुद्दे ऐकून घेत आपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे पोलिसांना फार त्रास सहन करावा लागला नाही.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
C9855
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना