शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

भेंडाळा परिसरातील शेतकऱ्यांना चिचडोह बँरेजचे पाणी मिळणार; शेकापच्या पाठपुराव्याला यश

Thursday, 7th February 2019 02:52:30 AM

गडचिरोली, ता.७: चिचडोह बँरेजचे काम पूर्ण होऊन या प्रकल्पात पाणी अडविण्याचे काम सुरू होत असतानाही त्यातील पाणी परिसरातील शेतीला मिळण्याच्या द्रुष्टीने प्रशासनाने कोणतेही नियोजन केलेले नव्हते. प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ शेतीला व्हावा, यासाठी शेतकरी कामगार पक्षाने पाठपुरावा केल्यानंतर जलसंपदा विभागाने चामोर्शी कालवा मंजूर करीत असल्याचे पत्र पाठविल्याने भेंडाळा परिसरातील अनेक गावांना सिंचनासाठी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

चिचडोह प्रकल्पात पाणी अडविण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतरही कालवा नसल्याने भेंडाळा परिसरातील अनेक गावांतील शेती सिंचनापासून वंचित होती. शेतकऱ्यांची ही गंभीर समस्या लक्षात घेऊन चामोर्शी कालवा मंजूर करण्यात यावा, अशी मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. 

चामोर्शी कालवा मंजूर करून मार्कडा,फोकुर्डी, भेंडाळा, रामाळा, फराडा, मोहूर्ली,घारगाव, दोटकुली, खंडाळा, वाघोली, तुकुम, एकोडी, कान्होली, नवेगाव, कळमगाव, बोरी, भिक्शी, रामसागर, मुरखळा चक,मुरखळा बल्लू, वाकडी, नागपूर, सोनापूर, चामोर्शी,हळदी माल,हळदी चक,सगणापूर, कान्होली हेटी या गावासह परिसरातील ४५ गावातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळण्याची सोय उपलब्ध करून द्यावी व त्यासाठी आवश्यक नियोजनाचा प्रस्ताव तयार करण्यासाठी प्रशासनाला आदेश देण्यात यावे, अशीही मागणी भाई रामदास जराते यांनी राज्याच्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. तसेच हे प्रकरण मार्गी लावण्यासाठी सातत्याने मंत्रालयस्तरावर पाठपुरावा केला होता. शेकापच्या या पाठपुराव्याला यश आले असून, जलसंपदा विभागाच्या आदेशानुसार चंद्रपूरच्या लघू पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी संबंधित योजनेचा प्रकल्प अहवाल बनविणे सुरु केले आहे. साधारणतः २१३६ हेक्टर शेतीकरिता पाणी निहित करण्यात आले आहे. या पाण्याचा उपसा राजीव उपसा सिंचन योजनेतंर्गत करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येणार आहे. 

शेकापच्या पाठपुराव्याने चिचडोह प्रकल्पाचे पाणी शेतीला मिळण्याची तरतूद झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी याबद्दल शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, महिला नेत्या जयश्री वेळदा,गडचिरोली विधानसभा चिटणीस नरेश मेश्राम, रोहिदास कुमरे,तालुका चिटणीस दिनेश चुधरी, रमेश चौखुंडे, प्रदीप आभारे, दामोदर रोहनकर, गंगाधर बोमनवार, प्रकाश सहारे यांचे आभार मानले असून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पाणी मिळेपर्यंत आपला पाठपूरावा सुरुच राहणार असल्याची प्रतिक्रिया भाई रामदास जराते यांनी दिली आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
JVSV1
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना