बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

भाजपने शेतकरी, ओबीसी, बेरोजगारांची निराशा केली:डॉ.नामदेव किरसान

Saturday, 2nd February 2019 11:52:43 PM

गडचिरोली, ता.३: भाजपने २०१४ च्या निवडणुकीदरम्यान दिलेल्या एकही आश्वासनाची ५ वर्षांत पूर्तता केली नाही. शेतकरी, ओबीसी व बेरोजगारांच्या समस्येत दिवसागणिक वाढ होत आहे, अशी टीका काँग्रेस नेते प्रा.डॉ.नामदेव किरसान यांनी पत्रकार परिषदेत केली.

डॉ.नामदेव किरसान म्हणाले की, केंद्र व राज्यातील भाजप सरकारला प्रश्न सोडविण्यात आलेल्या अपयशामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. भाजप सरकार व त्यांच्या नेत्यांनी दिलेली आश्वासने फोल ठरली. नोटाबंदीनंतर काळा पैसा विदेशातून आला नाही. आतंकवादी कारवायांत घट झाली नाही. उलट देश व महाराष्ट्र राज्य कर्जबाजारी झाले. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव मिळाला नाही. वर्षांत दोन कोटी बेरोजगारांना रोजगारही मिळाला नाही. महागाई गगनास भिडली. स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्नही सतावत आहे. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही. भांडवलदारांचे लांगुलचालन करुन शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत, असे डॉ.किरसान म्हणाले.

भाजप नेत्यांनी निवडणुकीपूर्वी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु पाच वर्षे होऊनही हा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी पोटतिडकीने प्रयत्न केले नाही. काँग्रेसने केलेल्या कामांचे उद्घाटन भाजप नेते करीत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत जनता भाजपविरोधात मतदानाच्या माध्यमातून रोष व्यक्त करेल, असा विश्वास डॉ.किरसान यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारने नुकतेच सादर केलेले बजेट हे निवडणूक डोळ्यापुढे ठेवून सादर करण्यात आले आहे. या बजेटमध्ये अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी काहीही करण्यात आले नाही, अशी टीका डॉ.किरसान यांनी केली.

भाजप सरकारला आलेले अपयश जनतेला दाखवून देऊन काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी १ फेब्रुवारीपासून गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात जनसंपर्क यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथून सुरु झाली असून, अहेरी, गडचिरोली, ब्रम्हपुरी, चिमूर या मार्गाने गोंदिया जिल्ह्यातील सालेकसापर्यंत जाईल. या यात्रेच्या माध्यमातून पक्षनेते राहुल गांधी यांच्या शक्ती प्रोजेक्टची माहिती काँग्रेस कार्यकर्त्यांना देण्यात येत असून, यात्रेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण होत आहे. लोकसभा क्षेत्रातील २० तालुक्यांतील २ हजार गावांमध्ये यात्रा पोहचणार असून, २८ फेब्रुवारीला यात्रेचा समारोप होईल, अशी माहिती डॉ.किरसान यांनी दिली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
0QDJZ
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना