बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

काव्यवाचन, अभिनय स्पर्धेत मुनघाटे महाविद्यालयाने पटकावले ९ पुरस्कार

Friday, 1st February 2019 01:50:43 AM

गडचिरोली, ता.१: राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागांतर्गत आयोजित जिल्हास्तरीय रंगमंच-अविष्कार स्पर्धेत कुरखेडा येथील श्री.गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाने १० पैकी ९ पुरस्कार पटकावून आपली वेगळी छाप पाडली.

राज्य मराठी विकास संस्थाद्वारा राम गणेश गडकरी स्मृतिशताब्दी व गदिमा-पुलं जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या साहित्यावर आधारित ही जिल्हास्तरीय स्पर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात पार पडली. जिल्हा संयोजक सुप्रसिद्ध गझलकार सुरेश शेंडे यांच्या समन्वयात ही स्पर्धा झाली. यातील काव्यवाचन व एकपात्री अभिनय या दोन्ही प्रकारांतील एकूण १० पैकी ९ पुरस्कार एकट्या श्री.गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पटकावले. या स्पर्धांमध्ये अकरावी ते पदव्युतर वर्गांतील अनेक महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. काव्यवाचनात गदिमा किंवा गोविंदाग्रज यांची कविता सादर करणे आणि एकपात्री अभिनय स्पर्धेत राम गणेश गडकरी किंवा पु.ल.देशपांडे यांच्या नाट्यकृती सादर करणे अशा दोन भागांत ही स्पर्धा झाली. 

काव्यवाचनात मुनघाटे महाविद्यालयाची विद्यार्थिनी मयुरी मेश्राम हिने ३ हजार रुपयांचे प्रथम, तर विशाखा खुणे हिने २५०० रुपयांचे द्वितीय पारितोषिक पटकावले. याच महाविद्यालयाच्या काजल भोयर हिने तृतीय( २ हजार रुपये),भाग्यश्री कवाडकर हिने चतुर्थ( दीड हजार रुपये) व यश वालदे याने १ हजार रुपयांचे पाचवे पारितोषिक पटकावले. एकपात्री अभिनय स्पर्धेत 'एकच प्याला' नाटकातील 'सिंधू' साकारत सभागृहातील सर्व रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या भाग्यश्री कवाडकर हिने ३ हजार रुपयांचे प्रथम, तर 'तळीराम' साकारणाऱ्या यश वालदे याने २ हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक पटकावले. 'गीता'ची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या काजल भोयर हिने १५०० रुपयांचे चतुर्थ पारितोषिक प्राप्त केले. शिवाय पुलंची 'फुलराणी' साकारणाऱ्या डिंपल बोरकर हिने १ हजार रुपयांचे पाचवे पारितोषिक मिळवले. सर्व विजेत्यांना ग्रंथ व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेतील १० बक्षिसांपैकी ९ बक्षिसे पटकावत मुनघाटे महाविद्यालयाने साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील आपले वर्चस्व निर्माण करीत गोविंदराव मुनघाटे यांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने एक पाऊल टाकल्याची बोलकी प्रतिक्रिया संस्थेचे संचालन अनिल मुनघाटे यांनी व्यक्त केली. मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर यांच्या मार्गदर्शनात स्पर्धेसाठी संवाद, स्वगत व कवितांची केलेली निवड विद्यार्थ्यांनी सार्थ ठरविल्याचे मत संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे यांनी व्यक्त केले. या यशाबद्दल संस्थेचे सचिव प्रा.डॉ.प्रमोद मुनघाटे, सर्व संचालक व मान्यवरांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

स्पर्धेची तयारी करण्यासाठी उपप्राचार्य पी.एस.खोपे, प्रा.हेमलता उराडे, डॉ.दीपक बन्सोड, प्रा.राखी शंभरकर, डॉ.विवेक मुरकुटे, प्रा.सातपुते, प्रा.धोंगडे, प्रा.महाजन, प्रा.हडप, प्रा.बोरकर, प्रा.हरीश बावनथडे, वृषभ मेश्राम, शबा शेख, कांचन डोंगरवार, महेश मोहुर्ले, सूरज रामटेके, प्रणाली शेंडे, लोकेश लांजेवार यांचे विशेष सहकार्य लाभले. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
EMPVQ
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना