शुक्रवार, 19 एप्रिल 2019
लक्षवेधी :
  वऱ्हाड घेऊन जाणारे वाहन उलटून तीन जण ठार, १२ जण जखमी-चामोर्शी तालुक्यातील भिवापूरनजीकची घटना             शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत याची खबरदारी घ्या: जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे कृषिविभागाला निर्देश             नर्सिंग कॉलेज शिष्यवृत्ती गैरव्यवहार प्रकरण:डॉ. प्रमोद साळवे यांच्यावरील एफआयआर उच्च न्यायालयाकडून रद्द             भीषण अपघातात चार ठार, १७ जण जखमी, नऊ जणांची प्रकृती गंभीर-आलापल्ली-पेरमिली मार्गावरील मेडपल्ली गावाजवळची घटना             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

नक्षलवाद्यांची भीती कमी होत आहे:पंतप्रधान नरेंद्र मोदी

Wednesday, 23rd January 2019 01:59:09 PM

गडचिरोली, ता.२३: माओवाद देशावर हावी होता. परंतु आपण नक्षल्यांना सडेतोड उत्तर दिल्याने त्यांचे मनसुबे उद्ध्वस्त होत असून, आता नक्षलवाद्यांबद्दलची लोकांच्या मनातील भीती कमी होत आहे. नक्षलग्रस्त जिल्ह्यांचा झपाट्याने विकास होत आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला.

'बूथ प्रमुखांशी संवाद' या कार्यक्रमाचे आयोजन आज येथील अभिनव लॉनवर आयोजित करण्यात आले होते. या कार्यकमाला 

केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे आदिवासी विकास व वनराज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, खा.अशोक नेते, भाजपचे पूर्व विदर्भ संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, विधान परिषद सदस्य आ.डॉ.रामदास आंबटकर, आ.डॉ.देवराव होळी, आ.क्रिष्णा गजबे, आ.कीर्तिकुमार भांगडिया, आ.संजय पुराम, माजी आमदार प्रा.अतुल देशकर, ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे, बाळा अंजनकर, नगराध्यक्ष योगीता पिपरे, माजी जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे यांच्यासह प्रदेश कार्यकारिणी सदस्य, तालुकाध्यक्ष, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, नगरपरिषदांचे सदस्य व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी बारामती, गडचिरोली, हिंगोली, नंदूरबार व नांदेड या पाच लोकसभा क्षेत्रातील बूथ प्रमुखांशी व्हीडिओ कॉन्फरंसींगद्वारे संवाद साधला. संध्याकाळी पावणेपाच वाजता पंतप्रधानांनी संवाद सुरु केला. सर्वप्रथम बारामती लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांना त्यांनी संबोधित केले.

पंतप्रधानांनी आपल्या संवादाची सुरुवात मराठी भाषेतून करुन उपस्थितांना मोहिनी घातली. 'सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मी बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीदिनी अभिवादन करतो. बाळासाहेबांनी सामान्य माणसासाठी काम केले. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी राज्य सरकारने १०० कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविली आहे', असे पंतप्रधान म्हणाले. त्यानंतर पंतप्रधानांनी हिंदी भाषेचा वापर केला. बारामतीच्या एका कार्यकर्त्याच्या प्रश्नावर पंतप्रधान म्हणाले,'भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांनी तयार केलेला पक्ष आहे. हा पक्ष लोकशाही तत्त्वावर चालणारा पक्ष आहे. काँग्रेस पक्षात परिवारवाद आहे. मात्र, भाजपा हाच एक परिवार आहे. काँग्रेस कल्चर म्हणजे वाईट वृत्ती, अशी टीका करुन पंतप्रधानांनी हे कल्चर संपविण्याचा आपण विडा उचलल्याचे सांगितले. शरद पवारांनी पक्षाचे अध्यक्षपद मागितले म्हणून काँग्रेसने त्यांचा अवमान केला. तेच पवार आज काँग्रेसशी सलगी साधत आहेत', असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाणला.

संवाद कार्यक्रमात दुसरा क्रमांक गडचिरोली जिल्ह्याचा लागला. पंतप्रधानांनी या जिल्ह्यासाठी ६ ते ७ मिनिटे दिली. सुरुवातीला खा.अशोक नेते यांनी हा जिल्हा देशातील सर्वांत मागास, आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त जिल्हा असून, देशातील ११५ आकांक्षित जिल्ह्यांमध्ये या जिल्ह्याचा समावेश होत असल्याचे सांगितले. रस्त्यांसाठी १२२४६ कोटी रुपये मिळाले असून, सडक योजना, उज्ज्वला गॅस, आवास, सौभाग्य योजना इत्यांदीमुळे जिल्ह्याचा विकास होत असल्याचे पंतप्रधानांना सांगितले. नागभिड-नागपूर रेल्वे ब्रॉडगेजच्या कामाला गती द्यावी, तसेच ओबीसींचे कमी झालेले आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, अशा प्रमुख दोन मागण्या केल्या. त्यानंतर मार्कडादेव येथील नरेंद्र अलसावार यांनी नक्षलवादावर प्रश्न विचारला. त्यावर पंतप्रधानांनी उत्तर दिले. आपण नक्षलग्रस्त जिल्ह्यांसाठी इन्फ्रास्ट्रक्चर दिले. त्यामुळे विकास होत आहे. जवानांनी नक्षल्यांना चोख प्रत्युत्तर दिल्याबद्दल मी त्यांना नमन करतो. पूर्वी देशात १२६ नक्षलग्रस्त जिल्हे होते. आता त्यात घट होऊन ही संख्या ९० झाली. पूर्वी देशात सर्वांत जास्त नक्षलप्रभावीत ३६ जिल्हे होते. आता ते केवळ ३० राहिले आहेत. आम्ही नक्षलग्रस्त भागात ४५०० किलोमीटरचे रस्ते निर्माण केले. २४०० मोबाईल टॉवर्स उभारले, तर ४ हजार टॉवर्सना मंजुरी दिली आहे. या जिल्ह्यांमध्ये केंद्रीय व नवोदय विद्यालये, बँका, एटीएमचे जाळे निर्माण केले. विकास होत असल्याने नक्षलवाद कमी झाला, असे पंतप्रधानांनी सांगितले. मात्र, खा.अशोक नेते यांनी उपस्थित केलेल्या दोन प्रश्नांवर पंतप्रधानांनी काहीही भाष्य केले नाही. अन्य बूथ प्रमुखांनाही प्रश्न विचारण्याची संधी मिळाली नाही.

कार्यक्रमापूर्वी किशन नागदेवे, बाबूराव कोहळे, आ.डॉ.देवराव होळी, आ.संजय पुराम, आ.कीर्तिकुमार भांगडिया यांनीही उपस्थितांना संबोधित केले.

अब की बार मोदी सरकार

आजच्या बूथप्रमुखांशी संवाद कार्यक्रमात मंचावर 'अब की बार मोदी सरकार' असा मोठा फलक लावला होता. शिवाय उपस्थितांकडूनही मोदींचाच जयघोष होत होता. त्यामुळे येणारी लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वात लढली जाईल आणि भावी पंतप्रधानही नरेंद्र मोदी हेच होतील, हे भाजपने पक्के ठरविल्याचे दिसून आले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
J5C9X
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना