गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.७: कर्मचारी कपात व लघु प्रकल्पांच्या खासगीकरणाला विरोध दर्शविण्यासाठी आज महावितरणच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप करुन सरकारचे लक्ष वेधले.
कर्मचाऱ्यांनी पोटेगाव मार्गावरील महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर निदर्शने करुन घोषणा दिल्या. वीज कर्मचारी अभियंता संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आजचा संप पुकारण्यात आला. महापारेषण कंपनीत स्टाफ सेटअपच्या नावाखाली मंजूर पदे कमी करु नये, महावितरणच्या कंपनीत पुनर्रचनेच्या नावाखाली संघटनांनी सुचविलेले पर्याय अंमलात आणावे, महावितरण कंपनीतील लघु विद्युत प्रकल्प खासगी संस्थांना देऊ नये, तसेच २१० मेगावॉटचे वीज संच बंद करु नये, तिन्ही कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी इत्यादी मागण्यांसाठी आजचा संप करण्यात आला. कृती समितीच्या शिखर पदाधिकाऱ्यांनी अनेक बैठकींमध्ये प्रशासन व ऊर्जामंत्र्यांशी चर्चा करुनही मागण्या मंजूर न झाल्याने संप करावा लागल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
एसईए संघटना, तांत्रिक संघटना, वर्कर्स फेडरेशन, इंटक, कामगार महासंघ इत्यादी संघटनांचे पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते.