शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

नैतिकता बदलली; आता सर्वांशी जुळवून घेत पत्रकारिता करावी लागते: श्याम पेठकर

Sunday, 6th January 2019 06:00:20 AM

गडचिरोली, ता.६: खासगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणानंतर जगाची मानसिकता बदलली आहे. नैतिकतेच्या संकल्पनादेखील बदलत चालल्या असून, आता सर्वांशी जुळवून घेत पत्रकारिता करण्याचे आव्हान पत्रकारांपुढे आहे, असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार, तरुण भारतचे संपादक व प्रसिद्ध कथा आणि पटकथालेखक श्याम पेठकर यांनी व्यक्त केले.

गडचिरोली प्रेसक्लबतर्फे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार दिन सोहळ्यात मुख्य वक्ते म्हणून ते बोलत होते. प्रेसक्बलचे अध्यक्ष अविनाश भांडेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष योगीता पिपरे, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे, ए.आर.खान, नगरसेवक प्रमोद पिपरे, प्रेसक्लबचे सचिव मनोज ताजने उपस्थित होते.

श्री.पेठकर पुढे म्हणाले, अलिकडे सर्वच क्षेत्रात आव्हाने उभी ठाकली असून, जग झपाट्याने बदलत चालले आहे. 'खाउजा' धोरणानंतर अन्य क्षेत्रांप्रमाणेच पत्रकारिताही बदलली आहे. आता पत्रकारिता हा व्यवसाय झाला आहे. पत्रकारिता हा व्यवसाय सुरक्षित राहिला नाही. नैतिकतेच्या संकल्पना बदलत चालल्याने सगळ्यांशी जुळवून घेत पत्रकारिता करावी लागते. माणसाचे अश्रू गूगलवरुन डाउनलोड करता येत नाही. त्यासाठी पत्रकारांना माणसांमध्ये जावं लागेल, असे पेठकर म्हणाले.

मुद्रित माध्यमांकडून इलेक्ट्रानिक माध्यमे व आता समाजमाध्यमे असे बदल पत्रकारितेत झाले आहेत. परंतु आता बातमीपेक्षा जाहिरात महत्वाची वाटू लागली आहे. पत्रकारांचं रोबोटीकरण झालं असून, धन व दंड शक्तीने पत्रकारांना नियंत्रित करता येते, हा विचार भांडवलदारांमध्ये रुजू लागला आहे. हे धोकादायक आहे. त्यासाठी पत्रकारांनी भरपूर वाचन केलं तरच 'का?' हा प्रश्न विचारण्याचे धाडस त्यांच्यात निर्माण होईल, असे परखड मत श्याम पेठकर यांनी व्यक्त केले.

यावेळी पेठकर यांनी अनेक विनोदी किस्से आणि कविता सांगत पत्रकारितेच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला.

पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले की, पोलिस आणि पत्रकारांमध्ये नेहमी उंदीर आणि मांजराचा खेळ सुरु असतो. दोघांचीही समाजाशी बांधिलकी असते. पत्रकार लोकांच्या भावना मांडत असतो. त्यामुळे त्यांचा लेखनाचा अधिकार कुणाला हिरावून घेता येणार नाही. सर्व स्तंभांचा हेतू एकच असला पाहिजे. चूक झाली तर कान टोचले पाहिजे, असे सांगून श्री.बलकवडे यांनी गडचिरोलीतील पोलिस या जिल्ह्याची वेगळी ओळख पुसण्याचे काम करीत असल्याचे सांगितले.

नगराध्यक्षा योगीता पिपरे यांनी जिल्ह्यातील पत्रकार सकारात्मक व टीकात्मक अशा दोन्ही प्रकारच्या बातम्या छापत असल्याचे सांगून पत्रकारांबद्दल गौरवोद्गार काढले. याप्रसंगी प्रशांत दैठणकर व अविनाश भांडेकर यांनीही संबोधित केले. 

डॉ.राजाभाऊ मुनघाटे यांना जिल्हा गौरव पुरस्कार प्रदान

याप्रसंगी अतिथींच्या हस्ते प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे यांना गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्कार, तर अहेरीचे पत्रकार ए.आर.खान यांना सेवाव्रती पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. अतिथींनी प्राचार्य मुनघाटे यांच्या कार्याचा गौरव केला. सत्काराला उत्तर देताना प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे म्हणाले की, माझ्या जडणघडणीत माझे वडील गो.ना.मुनघाटे व दंडकारण्य परिवाराचा सिंहाचा वाटा आहे. माझ्या वडिलांनी गोरगरीब आदिवासी माणूस शिकला पाहिजे म्हणून १९९० मध्ये कुरखेड्यात महाविद्यालय सुरु केले. आज या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी मोठ्या हुद्द्यावर आहेत. यावरुन वडिलांची तळमळ सार्थ झाली. शिक्षण क्षेत्रात काम करताना आपण शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. या जिल्ह्याची सांस्कृतिक ओळख आहे. येथे बालगंधर्व येऊन गेले. येथील झाडीपट्टी रंगभूमी समृद्ध असून, अभिरुची असलेला रसिक आहे. त्यांची नोंद पत्रकारांनी घ्यावी, असे आवाहन डॉ.मुनघाटे यांनी केले. गडचिरोलीचा पत्रकार संघ समर्थ असून, त्यांनी दिलेला पुरस्कार हा मोठा बहुमान असल्याची भावना प्राचार्य डॉ.मुनघाटे यांनी व्यक्त केली. याप्रसंगी ए.आर.खान यांनी दुर्गम भागातील पत्रकारितेचे अनुभव विशद करुन आपल्या मार्गदर्शनात अनेक जण चांगले पत्रकार झाल्याचे अभिमानाने सांगितले.

कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन जयन्त निमगडे, प्रास्ताविक मनोज ताजने, पाहुण्यांचा परिचय नंदकिशारे काथवटे, तर आभार प्रदर्शन अरविंद खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रेसक्लब सदस्य सुरेश पद्मशाली, रोहिदास राऊत, सुरेश सरोदे, शेमदेव चाफले, विलास दशमुखे, सुरेश नगराळे, रुपराज वाकोडे, नीलेश पटले, मारोतराव मेश्राम, सुनील चौरसिया आदींनी सहकार्य केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
QME24
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना