मंगळवार, 16 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

सात जहाल नक्षल्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण

Saturday, 5th January 2019 06:46:03 AM

गडचिरोली, ता.५: हत्या, जाळपोळ व अन्य हिंसक गुन्ह्यांत सहभागी असलेल्या व सुमारे ३१ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर असलेल्या ७ जहाल नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली..

पत्रकार परिषदेला अपर पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, डॉ.हरी बालाजी, डॉ.मोहित गर्ग उपस्थित होते. पोलिसांनी जनतेसाठी केलेली विविध कामे तसेच विकासात्मक योजना राबविल्याने पोलिसांविषयी विश्वास वाढला असून, सात नक्षल्यांनी आत्मसमर्पण केल्याचे पोलिस अधीक्षक श्री.बलकवडे यांनी सांगितले. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये विकास उर्फ साधू पोदाळी, वैशाली बाबूराव वेलादी, सूरज उर्फ आकाश , धनातू तानू हुर्रा, मोहन उर्फ दुलसा केसा कोवसा, नवीन उर्फ अशोक पेका, जन्नी उर्फ कविता हेवडा धुर्वा व रत्ती उर्फ दुर्गी गेब्बा पुंगाटी यांचा समावेश आहे.

विकास उर्फ साधू पोदाळी(२७) हा फेब्रुवारी २०१३ मध्ये बिनागुंडा गाव चेतना नाट्य मंचमध्ये सहभागी झाला. मार्च २०१४ पासून छत्तीसगडमधील कोडेलयेर जन मिलिशिया दलममध्ये तो कार्यरत होता. त्याच्यावर ३ चकमकींचे गुन्हे दाखल असून, राज्य शासनाने त्याच्यावर ४ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.

वैशाली वेलादी(१८) ही जानेवारी २०१५ मध्ये राही दलम सदस्य म्हणून भरती झाली. जानेवारी-फेब्रुवारी २०१८ मध्ये ती चातगाव दलममध्ये गेली व त्यानंतर पुन्हा राही दलममध्ये परतली. ऑगस्ट २०१८ मध्ये ती भामरागड दलममध्ये गेली. तिच्यावर साडेचार लाख रुपयांचे बक्षीस होते. २५ वर्षीय सूरज उर्फ आकाश हुर्रा हा फेब्रुवारी २०१० मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाला. एप्रिल २०११ ते एप्रिल २०१३ या कालावधीत तो धानोरा दलम व मे २०१३ मध्ये पुन्हा टिपागड दलममध्ये गेला. २०१५ मध्ये त्याला पीपीसीएल पदावर पदोन्नती देण्यात आली. जानेवारी २०१७ पर्यंत कसनसूर अॅक्शन टीममध्ये तो कार्यरत होता. फेब्रुवारी मध्ये तो कसनसूर दलममध्ये पीपीसीएम म्हणून कार्यरत झाला. त्याच्यावर १३ चकमकी, ५ खून, ३ भूसुरुंगस्फोट, जाळपोळ इत्यादी गुन्हे दाखल असून, शासनाने त्यच्यावर साडेचार लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

मोहन उर्फ दुलसा कोवसी(१९) हा एप्रिल २०१७ पर्यंत भामरागड दलममध्ये सदस्य म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर २ चकमकी व १ खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्याच्यावर साडेचार लाखांचे बक्षीस होते. नवीन उर्फ अशोक पैका(२५) हा गट्टा दलममध्ये बदली होऊन ऑगस्ट २०१८ पर्यंत सदस्य होता. त्याच्यावर ५ चकमकी, १ भूसुरुंगस्फोट, ६ खून, १ अपहरण, १ हल्ला व २ जाळपोळीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर साडेचार लाखांचे बक्षीस होते.

जन्नी उर्फ कविता हेवडा धुर्वा(२६) ही डिसेंबरपर्यंत कंपनी क्रमांक ४, प्लाटून क्रमांक ए मध्ये सेक्शन उपकमांडर होती. तिच्यावर ७ चकमकी, २ जाळपोळी, ३ खून, १ भूसुरुंगस्फोट इत्यादी गुन्हे दाखल आहे. तिच्यावर ५ लाखांचे बक्षीस होते. २९ वर्षीय रत्तो उर्फ जनीला उर्फ दुर्गी गेबा पुंगाटी हिच्यावर ५ लाखांचे बक्षीस होते. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
X0E9K
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना