शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

राफेल घोटाळ्याची संयुक्त सांसदीय समितीमार्फत चौकशी करा: काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे

Sunday, 23rd December 2018 01:38:07 AM

गडचिरोली, ता.२३: राफेल विमान खरेदी प्रकरणात भाजप सरकारने सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केली असून, या घोटाळ्याची चौकशी संयुक्त सांसदीय समितीमार्फत करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

अतुल लोंढे म्हणाले की, राफेल घोटाळा हा देशातील सर्वांत मोठा घोटाळा असून, काँग्रेस पक्ष त्यावर ठाम आहे. २००७ मध्ये यूपीए सरकारने फ्रान्स सरकारशी करार करुन १२६ लढाऊ राफेल विमानांची मागणी नोंदवली होती. ती प्रक्रिया सुरु असतानाच निवडणुका आल्या. पुढे भाजप सरकार आल्यानंतर या सरकारने केवळ ३६ विमानांची मागणी केली. विशेष म्हणजे, हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीला प्रदीर्घ अनुभव असताना आणि त्यांच्याकडे कुशल मनुष्यबळ उपलब्ध असताना १२ दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या व कुठलही अनुभव आणि मनुष्यबळ उपलब्ध नसलेल्या अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स कंपनीला कसे काम दिले, असा सवाल श्री.लोढे यांनी केला.

यूपीए सरकारच्या काळात एका विमानाची किंमत ५२६ कोटी रुपये होती. ती मोदी सरकारने १६७० रुपये कशी केली, असा सवाल करुन श्री.लोंढे यांनी संबंधितांना ३० हजार कोटी रुपयांचा लाभ पोहचविल्याचा आरोप केला. काँग्रेस पक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो. मात्र, देशाच्या संरक्षणासंबंधीच्या विषयांवर सर्वोच्च न्यायालयाच्या काही मर्यादा आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय हे राफेल घोटाळ्याची चौकशी करणारे योग्य ठिकाण नाही, असे काँग्रेसने पूर्वीच स्पष्ट केल्याचे सांगून श्री.लोंढे यांनी संयुक्त सांसदीय समितीमार्फत या घोटाळ्याची चौकशी करण्याची जोरदार मागणी केली.

मोदी सरकारने खोटी माहिती देऊन सर्वोच्च्‍ा न्यायालयाची दिशाभूल केली. ही दिशाभूल जनतेचीदेखील असून, संसदेच्या विशेषाधिकाराचा भंग आहे. शिवाय सरकारी तिजोरीचे नुकसान करुन देशाची सुरक्षा कमजोर करण्याचा हा प्रयत्न आहे, असे अतुल लोंढे म्हणाले.

पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, माजी प्रदेश सचिव हसन गिलानी, शहराध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, प्रभाकर वासेकर, पांडुरंग घोटेकर, पी.टी.मसराम, काशिनाथ भडके, शंकरराव सालोटकर, वसंत राऊत, अमोल भडांगे, रजनिकांत मोटघरे उपस्थित होते. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
RDM0S
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना