शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

नक्षल्यांना शस्त्र पुरविणाऱ्या संशयितास अटक

Sunday, 11th November 2018 08:12:23 AM

गडचिरोली, ता.११: मागील २८ वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल्यांना शस्त्रे पुरवठा करण्याचा संशय असलेल्या अजित रॉय(४८) नामक व्यक्तीस दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने नुकतीच अटक केली आहे.

मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर येथील रहिवासी असलेला अजित रॉय फार वर्षांपासून नक्षल चळवळीशी संबंधित होता. तो नक्षल्यांना शस्त्र पुरवठा करीत होता, असा त्याच्यावर संशय आहे. काही नक्षली चकमकीत ठार झाल्यानंतर अजित रॉय याने वेगळ्या साधनांचा वापर करुन नक्षल्यांसाठी निधी गोळा करण्याचे काम सुरु केले. यंदा एप्रिल महिन्यात कसनासूरच्या जंगलात ४० नक्षली ठार झाले होते. त्यातील एका नक्षल नेत्याशी अजित रॉय याचे घनिष्ठ संबंध होते. त्याच्यावर दोन लाख रुपयांचे बक्षीस होते, असे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. काल त्याला आष्टी पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित रॉय हा २०१४ ते २०१७ अशी तीन वर्षे गोविंदपूर येथील तंटामुक्त समितीचा अध्यक्ष होता. अहेरीच्या एका कंत्राटदाराचे रस्ता बांधकामाची तो देखरेख करीत होता. परंतु मध्यंतरी पोलिस आपल्या मागावर असल्याचे समजताच तीन-चार महिन्यांपासून तो गायब होता.

जुलै महिन्यात दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने रामकृष्ण सिंह यास एका गुन्ह्यात अटक केली होती. त्याच्याकडून पोलिसांनी त्यावेळी ४०७ काडतुसे जप्त केली होती. पुढे १३ ऑक्टोबरला केलेल्या एका कारवाईत संजय सिंह यास २२ काडतुसांसह पकडण्यात आले होते.  दोघांच्या चौकशीत अजित रॉयचे नाव पुढे आले होते. त्यावरुन त्याला अटक करण्यात आली. अजितकडून ४५ काडतुसे जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. १९९२ पासून अजित रॉय हा नक्षल्यांच्या वेगवेगळ्या कमांडर्सना काडतुसे पुरविण्याचे काम करीत होता, असे दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेचे म्हणणे आहे.

मात्र, अजित रॉय नेमका कोण आहे व त्याचा खरोखर नक्षल्यांशी संबंध आहे काय, हे चौकशीअंतीच स्पष्ट होणार आहे. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
TFN9B
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना