गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

वाहन अंगावर चालवून दारु तस्करांनी केली पोलिस उपनिरीक्षकाची हत्या

Tuesday, 6th November 2018 08:56:47 PM

नागभिड, ता.६: अवैधरित्या दारुची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करीत असताना वाहनचालकाने पोलिसांच्या अंगावरुन वाहन नेल्याने एक पोलिस उपनिरीक्षक जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास तालुक्यातील मौशी गावाजवळ घडली. छत्रपती किसनराव चिडे(४०) असे मृत पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र सुन्न झाला आहे.

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी आहे. परंतु काही दारुविक्रेते अन्य जिल्ह्यांतून अवैधरित्या दारुची वाहतूक करुन विकत असतात. आज सकाळी पवनी-तोरगावमार्गे मौशीच्या दिशेने एका वाहनातून दारु वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती मिळताच नागभिड पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक छत्रपती चिडे हे पोलिस उपनिरीक्षक ए.एस.मलकापुरे, संदीप कोवे, पितांबर खरकाटे व रामकृष्ण बोथे या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन मौशी गावाच्या दिशेने निघाले. दारुची वाहतूक करणारे स्कॉर्पिओ वाहन दिसताच श्री.चिडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या वाहनाचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. दरम्यान मौशी गावाजवळच्या गोसेखुर्द धरणाच्या कालव्याजवळ दारु वाहतूक करणाऱ्या स्कॉर्पिओने समोरुन येणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिली. त्यामुळे स्कॉर्पिओ वाहन थांबले. त्यामुळे मागून पाठलाग करणारे पोलिस आपले वाहन थांबूवन खाली उतरले. त्यानंतर ते दारुची वाहतूक करणाऱ्या स्कॉर्पिओच्या दिशेने पायी चालू लागले. एवढ्यात दारु असलेल्या वाहनचालकाने आपले वाहन मागे घेऊन ते पोलिसांच्या अंगावर नेण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने पोलिस भांबावले. अत्यंत सावधपणे तीन पोलिस बाजूला झाले. मात्र, ठाणेदार छत्रपती चिडे यांच्या अंगावरुन वाहन गेल्याने ते जागीच ठार झाले. हे वाहन गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथील कुख्यात दारुविक्रेत्याचे असल्याची माहिती आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले. सहकारी पोलिसांनी चिडे यांना ब्रम्हपुरी येथील ख्रिस्तानंद दवाखान्यात हलविले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. संध्याकाळी साडेसहा वाजता त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह चंद्रपूरला रवाना करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच सकाळीच पोलिस अधीक्षक डॉ.महेशवर रेड्डी यांनी तत्काळ ब्रम्हपुरी गाठली. या घटनेमुळे अख्खे पोलिस प्रशासन हादरले असून, महाराष्ट्र सुन्न झाला आहे. दरम्यान, राज्याचे वित्त व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली असून, पीएसआय चिडे यांच्या मुलाला अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचे तसेच त्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणातील आरोपींना तातडीने जेरबंद करण्याचे आदेश देऊन श्री.मुनगंटीवार यांनी विशेष वकील नेमण्याची सूचना केली आहे. चिडे यांच्या हत्येनंतर पोलिस महानिरीक्षक हे आज तातडीने ब्रम्हपुरी येथे दाखल झाले. त्यांनी आरोपींना कोणत्याही परिस्थितीत पकडण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, घटनास्थळावर आरोपीचा एक मोबाईल सापडला असून, त्यातील संभाषणावरुन बरेच धागेदोरे गवसणार आहेत. या आरोपी दारुविक्रेत्यांशी कोणत्याही पोलिस कर्मचाऱ्याचे संबंध असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यास तत्काळ निलंबित करण्यात येईल, असे पोलिस अधीक्षक डॉ.रेड्डी यांनी सांगितले.

पोलिस अधीक्षकांनी गौरविले होते पीएसआय चिडे यांना

२२ ऑगस्ट २०१८ रोजी ब्रम्हपुरी तालुक्यातील खंडाळा येथील युग मेश्राम या दोन वर्षीय बालकाची गुप्तधनासाठी हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पीएसआय चिडे यांनी केला आणि अवघ्या काही दिवसांतच आरोपींना जेरबंद केले. या कामगिरीबद्दल चंद्रपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी २४ ऑक्टोबरला श्री.चिडे यांचा 'उत्कृष्ठ पोलिस अधिकारी' म्हणून प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला होता. 

कोण होते पीएसआय चिडे

पीएसआय छत्रपती चिडे हे यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील मारेगाव येथील मूळ रहिवासी होते. २०१३-१४ मध्ये ते पोलिस उपनिरीक्षक म्हणून पोलिस सेवेत रुजू झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व एक मुलगा आहे. परिवार चंद्रपूर येथे वास्तव्यास आहे. दारु विक्रेत्यांनी ठार केल्याने चिडे कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
U48R0
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना