गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

मोदी सरकार निष्कलंक; पुन्हा एनडीएचेच सरकार येणार:रामदास आठवले

Thursday, 1st November 2018 07:12:47 AM

गडचिरोली, ता.१: बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे एनडीए सरकारने नद्या जोडो प्रकल्प हाती घेतला आहे. त्यामुळे सिंचनाची समस्या मार्गी लागेल. मात्र, काँग्रेसने नद्या तर जोडल्या नाहीच,पण माणसंही जोडली नाहीत, अशी कोपरखळी मारत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी नरेंद्र मोदी सरकार निष्कलंक असून, २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा एनडीएचेच सरकार येईल व नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील, असे ठामपणे सांगितले.

रामदास आठवले यांनी आज गडचिरोलीत जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, राफेल खरेदीत अजिबात घोटाळा नाही. मोदी सरकारवर कुठलाही डाग नाही. नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गांसाठी १० लाख कोटी रुपयांची तरतूद करुन कामे सुरु केली आहेत. सरकारच्या कामामुळे २०१९ च्या निवडणुकीत भाजपला ३०० हून अधिक व एनडीएला ४०० जागा मिळतील, असा दावा रामदास आठवले यांनी केला. शिवसेनेने भाजप-रिपाइं युतीसोबत यावे, यासाठी आपला आग्रह असल्याचेही त्यांनी सांगितले.

हे सरकार दलितविरोधी नाही. मोदींनी संविधान हा माझा धर्मग्रंथ आहे, असे म्हटले आहे, तर मोहन भागवत यांचाही आरक्षणाला विरोध नाही. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादीचे लोक विनाकारण अफवा पसरवत आहेत. ते संविधान बचाव रॅली काढत आहेत. मी संविधान वाचविण्यासाठी सक्षम आहे. काँग्रेसने नद्या जोडल्या नाहीत आणि माणसंही जोडली नाहीत. उलट हिंदू-मुस्लिम अशी फूट पाडली, असा टोला आठवले यांनी हाणला. मराठ्यांना १६ टक्के आरक्षण मिळाले पाहिजे, अशी रिपाइंची भूमिका आहे. परंतु हा विषय न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे आरक्षणासाठी संसदेने कायदा करावा, अशी विनंती आपण पंतप्रधानांना करणार आहोत. यापूर्वीही एनडीएच्या बैठकीत दोनदा हा मुद्दा आपण मांडला, असे आठवले म्हणाले. आता उच्चवर्णीयदेखील आरक्षण मागत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. त्यांना आर्थिक आधारावर आरक्षण देण्यात काहीच हरकत नाही. आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरुन ७५ टक्क्यांवर न्यावे, अशी विनंती आपण पंतप्रधानांना करणार असल्याचे रामदास आठवलेंनी सांगितले.

रिपब्लिकन पक्ष नेहमीच लहान राज्य निर्मितीच्या बाजूने राहिला आहे. स्वतंत्र विदर्भ झाला पाहिजे, ही भाजपचीही भूमिका आहे. एनडीएच्या बैठकीत हा मुद्दा मांडू. परंतु लोकांनी जोरकसपणे मागणी केली नाही. स्वतंत्र विदर्भासाठी लोकांनी आता उठाव करावा, असे आवाहनही आठवले यांनी यावेळी केले. केवळ नेत्यांचे ऐक्य होऊन चालणार नाही, तर जनतेने एकत्र यावे, अशी भूमिका आठवले यांनी रिपब्लिकन ऐक्याविषयी मांडली. ऐक्य झालं तर आपण प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात काम करायला तयार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दलित, आदिवासींना न्याय मिळाला पाहिजे, ही नक्षल्यांची मागणी योग्य आहे. परंतु त्यांचा मार्ग योग्य नाही. नक्षल्यांनी हिंसेचा मार्ग सोडून बुद्धाचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन आठवले यांनी केले.

 याप्रसंगी रामदास आठवले यांनी शासनाच्या विविध योजनांविषयीही माहिती दिली. पत्रकार परिषदेला रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष एल.के.मडावी, भिमराव बन्सोड, सिद्धार्थ पाथर्डे, अशोक रामटेके, संतोष रामटेके, अशोक घोटेकर उपस्थित होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
440EF
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना