गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

धान व कापसाच्या नुकसानीचे पंचनामे करा:शेतकरी कामगार पक्षाची मागणी

Monday, 29th October 2018 05:05:29 AM

गडचिरोली, ता.२९:जिल्ह्यातील धान व कापूस या पिकांना अखेरचे पाणी मिळू न शकल्याने दोन्ही पिके परिपक्व होऊ शकली नाही. परिणामी धानाचा उतारा ७० टक्के कमी येण्याची चिन्हे असून, कापसाचे बोंड पूर्णपणे वाळू लागले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, प्रशासनाने तहसीलदारांमार्फत तत्काळ दोन्ही पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावे, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.

शेकापच्या महिला नेत्या जयश्री वेळदा यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने आज अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक चौधरी यांची भेट घेऊन निवेदन दिले. शिष्टमंडळात पक्षाचे जिल्हा सहचिटणीस वसंत गावतुरे, गडचिरोली विधानसभा चिटणीस नरेश मेश्राम, आरमोरी विधानसभा चिटणीस रोहिदास कुमरे, पुरोगामी महिला संघटनेच्या जिल्हा चिटणीस अर्चना चुधरी, ओबीसी जागृती अभियानाचे जिल्हा समन्वयक दिनेश बोरकुटे, चामोर्शी तालुका चिटणीस दिनेश चुधरी, कृपाळा येथील शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते मुखरु जुमनाके यांचा समावेश होता.

यंदाच्या खरीप हंगामात परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने धान व कापूस पिकाला शेवटचे पाणी मिळाले नाही. जलस्त्रोत आटल्याने तलाव वा बोड्यांमधूनही पाणी देणे शक्य झाले नाही. चामोर्शी तालुक्यात दिना धरणाचे पाणी शेवटच्या गावांपर्यंत पोहचू शकले नाही. त्यातच राज्य सरकारने ऐनवेळी भारनियमन केल्यामुळे हातात आलेले पीक वाया गेले. एकंदरित सरकारचे शेतकरीविरोधी धोरण व नैसर्गिक आपत्तीमुळे दोन्ही पिकांच्या उत्पादनात प्रचंड तूट आली असून, दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

त्यामुळे प्रशासनाने करपलेले धान व कापसाची पाहणी करुन पंचनामे करण्याचे आदेश तत्काळ तहसीलदारांना द्यावे, अशी मागणी शेकाप नेत्यांनी निवेदनाद्वारे केली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
BTNK1
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना