गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

विदर्भाबाबत जेव्हा वाद होणार नाही; तेव्हाच स्वतंत्र विदर्भ करु-खा.रावसाहेब दानवे

Saturday, 27th October 2018 05:53:09 AM

गडचिरोली, ता.२७: स्वतंत्र विदर्भ व्हावा की नाही, याबाबत भिन्न मतप्रवाह आहेत. भाजपने जरी स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन दिले असले; तरी जेव्हा वाद निर्माण होणार नाही अशी स्थिती येईल; तेव्हाच स्वतंत्र विदर्भाची निर्मिती करु, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी आज येथे केले.

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील पक्ष संघटन व बूथ रचनेचा आढावा घेण्यासाठी खा.दानवे आज गडचिरोलीत आले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष खासदार अशोक नेते, जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर, चिमूरचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया, आ.कृष्णा गजबे, आ. डॉ. देवराव होळी, आ.संजय पुराम, माजी आमदार प्रा.अतुल देशकर, लोकसभा विस्तारक बाबूराव कोहळे,  जिल्हा उपाध्यक्ष रेखा डोळस यांच्यासह पक्षाचे निवडक पदाधिकारी उपस्थित होते. खा.दानवे पुढे म्हणाले, विकासाच्या दृष्टीने मोठ्या राज्यांचे विभाजन करुन लहान राज्ये निर्माण व्हावेत, अशी भाजपची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना अनेक छोटी राज्ये निर्माण करण्यात आली. विदर्भाच्या बाबतीतही आमची हीच भूमिका आहे. मात्र, काही जणांचा विरोध आहे. त्यामुळे वाद निर्माण होणार नाही अशी परिस्थिती निर्माण होताच आम्ही स्वतंत्र विदर्भ निर्माण करु, असे खा.दानवे म्हणाले. पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढीबाबत जनतेत असंतोष आहे, हे खरे आहे. मात्र, दरवाढ हे काँग्रेसचे पाप आहे, असे सांगून खा.दानवे यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने तुर्तास भाववाढ रोखणे शक्य नाही, असे स्पष्ट केले. शिवसेनेसारख्या समविचारी पक्षांशी युती व्हावी, अशी भाजपची इच्छा आहे, असेही ते म्हणाले.

२०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुका आणि त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायत निवडणुकांनतर भाजप हा देशातील सर्वांत मोठा पक्ष ठरला. सरकार आल्यानंतर पक्षसंघटनेकडे दुर्लक्ष होते. परंतु भाजपने दोन्हीकडे लक्ष दिलं. त्यामुळेच आज विधानसभेच्या २८८ मतदारसंघांमध्ये २८८ विस्तारक व लोकसभेच्या ४८ क्षेत्रांमध्ये वेगळे विस्तारक आहेत. राज्यात ९१ हजार ४०० बूथ आहेत. त्यापैकी भाजपने ८८ हजार बूथप्रमुखांची नेमणूक केली आहे. त्यापैकी ८३ हजार बूथप्रमुखांची पडताळणी आम्ही पूर्ण केली आहे, अशी माहिती खा.दानवे यांनी दिली.

'वन बूथ-२५ युथ' असे भाजपचे यंदाचे धोरण असून, एका विधानसभेत सरासरी ३०० बूथ असे गृहित धरले तर एका विधानसभेत ७ हजार ५०० कार्यकर्ते नेमले जात आहेत. एका युवकाला ६० मतदारांची जबाबदारी देण्यात आली असून, मतदानाच्या दिवशी १० वाजताच्या आत आमचे युवक कार्यकर्ते मतदारांना मतदान करायला घेऊन जाणार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपला अजिबात चिंता नाही, असे खा.दानवे यांनी स्पष्ट केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
AQPS1
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना