गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

उद्योगाबरोबरच लॉयड मेटल्सची पर्यावरण रक्षणाशीही बांधिलकी: बोदलीत करणार ११ हजार वृक्षलागवड

Thursday, 25th October 2018 11:38:59 PM

गडचिरोली, २६: औद्योगिक क्षेत्रात देशात नावलौकिक प्राप्त केलेल्या लॉयड मेटल्स आणि एनर्जी लिमिटेड या अग्रगण्य संस्थेने आता जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाबरोबरच पर्यावरण रक्षणाचाही विडा उचलला आहे. लॉयडने राज्य शासनाशी करार केला असून, त्या माध्यमातून बोदली येथे १० हेक्टर जमिनीवर सुमारे ११ हजार रोपलागवड केली जाणार आहे.

मंगळवारी(ता.२३) राज्याचे वने व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली अवनत क्षेत्रावर वनीकरण करण्याबाबत वन विभाग, औद्योगिक संस्था व अशासकीय संस्था यांच्यात त्रिपक्षीय करार करण्यात आले. या बैठकीस वन सचिव विकास खारगे, लॉयड मेटल्सचे उपाध्यक्ष अतुल खाडिलकर यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

औद्योगिक संस्थां व कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणात सामाजिक दायित्व निधीची उपलब्धता असते. ज्या कंपन्या त्रिपक्षीय कराराद्वारे वृक्षलागवडीत सहभागी होऊ इच्छितात; त्यांना वृक्षलागवडीच्या कामात सहभागी करून घेतले जावे तसेच ज्या कंपन्या केवळ आपला सामाजिक दायित्व निधी देऊ इच्छितात; त्यांना विविध ठिकाणी होणाऱ्या वृक्षलागवडीची माहिती देऊन त्यासाठी त्यांचे वित्तीय साहाय्य घेतले जावे, यासाठी वृक्षलागवडीसाठी उपलब्ध असलेल्या जागा व इतर संबंधित माहिती (ट्रीगार्ड, पाण्याची व्यवस्था, वृक्षांचे जतन आणि संवर्धन)  ज्यात ते निधीच्या माध्यमातून योगदान देऊ शकतात त्यांची यादी केली जावी व ती त्यांना पाठवली जावी, तसेच 

यंदा हरित दिवाळी साजरी केली जावी,असे आवाहन सुधीर  मुनगंटीवार यांनी यावेळी केले. ते म्हणाले की, विदर्भात ९२ हजार हेक्टर झुडपी जंगल आहे तिथे तसेच मराठवाड्यात वृक्ष लागवडीला प्राधान्य दिले जावे, मराठवाड्यातील इको बटालियनला सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून सहकार्य केले जावे, सामाजिक दायित्व निधीतून मराठवाड्यात शेतात, शेतजमीनीवर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला जावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

 मुनगंटीवार यांच्या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद देत लॉयड मेटल्सने सामाजिक दायित्वात पुढाकार घेण्यासाठी पावले उचचली.

मंगळवारी ५५.७० हेक्टर वनक्षेत्रावर जवळपास ५० हजार रोपे लावण्यासाठी चार औद्योगिक तसेच अशासकीय संस्थांना मान्यता देण्यात आली. यामध्ये लॉईडस मेटल्स ॲण्ड एनर्जी लि आणि ग्रामीण लोकसेवा संस्था, गुमलकोंडा ही संस्था  गडचिरोली तालुक्यातील बोदली येथे १० हेक्टरवर ११ हजार रोपे लावणार आहे. तसेच मे. जिंदाल स्टील लि. डोलवी ही संस्था मौजे डोलवी, ता. पेण, जि. रायगड येथे २५ हेक्टरवर जवळपास २८ हजार वृक्ष लावणार आहे.

स्पॅन फुडस्, पुणे आणि रोटरी क्लब, पुणे या संस्था मौजे महम्मदवाडी ता. हवेली, जि. पुणे येथे १८ हेक्टरवर ७२०० रोपं लावणार आहेत. श्री. गजानन महाराज संस्थान, शेगांव, श्री. गजानन शिक्षण संस्था- शेगांव ही संस्था मौजे गिरडा, ता. बुलढाणा, जि. बुलढाणा येथे २.७० हेक्टरवर १६८७ वृक्ष लावणार आहे. या चार ही औद्योगिक आणि अशासकीय संस्थांकडून होणाऱ्या अंदाजे ५० हजार वृक्षलागवडीसाठी ते २ कोटी ३० लाख रुपयांच्या आसपास खर्च करणार आहेत. वन विभागाच्या जमिनीवर सात वर्षांचा करार करून या संस्था वृक्षलागवड, जतन आणि संवर्धन करतात. त्यानंतर हिरवाई फुललेलं हे वन, वन विभागाच्या ताब्यात दिले जाते. राज्यातील हरित क्षेत्र वाढण्यासाठी हे त्रिपक्षीय करार उपयुक्त सिद्ध  होत आहे.

कोनसरीतील लोहप्रकल्पासाठी लॉयड सिद्ध

एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील पहाडावरील लोहखनिजाची लीज मिळाल्यानंतर लॉयड मेटल्स कंपनीने चामोर्शी तालुक्यातील आष्टीनजीकच्या कोनसरी येथे लोहप्रकल्प उभारण्याची घोषणा केली होती. त्याअनुषंगाने लॉयडने जवळपास ३५ शेतकऱ्यांची सुमारे ५०.२९ हेक्टर शेतजमीन संपादित करुन शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला दिला आहे. 

फेब्रुवारी २०१८ मध्ये मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत  'मॅग्नेटिक महाराष्ट्र' परिषद झाली. या परिषदेत राज्य सरकार व लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार झाला. या करारानुसार, लॉयड मेटल्स कंपनी कोनसरी येथे ७०० कोटी रुपयांचा प्रकल्प उभारणार असून, त्यातून सुमारे ८०० सुशिक्षित बेरोजगारांना प्रत्यक्षात रोजगार मिळणार आहे. उद्योगासंबंधीची संपूर्ण प्रक्रिया जवळपास आटोपत आली असून, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ व्हावा, यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे लॉयड मेटल्सच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

यामुळे लवकरच कोनसरी येथील लोहप्रकल्पाच्या कामाला सुरुवात होऊन बेरोजगारांना रोजगारांची संधी मिळेल. शिवाय प्रदूषणमुक्तीसाठीही लॉयडने पावले उचलल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
44PVC
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना