शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

घरपोच दारूबाबत राज्य शासनाने स्त्रियांना आश्वस्त करावे:पद्मश्री डॉ. अभय व डॉ. राणी बंग

Tuesday, 16th October 2018 06:56:54 AM

गडचिरोली, ता.१६: १४ ऑक्टोबरला एका इंग्रजी दैनिकाने राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाखतीच्या आधारे एक वृत्त प्रसिद्ध केले. 'आता लोकांना दारूची ऑनलाईन मागणी नोंदविता येईल आणि त्यांना ती घरपोच मिळेल', असा या वृत्ताचा आशय होता. अशा माध्यमातून दारू मिळाल्यास होणारे फायदे वर्णन करीत दारू पिल्याने होत असलेले अपघात कमी करणे हा यामागचा सर्वात मोठा हेतू असल्याचे त्यांनी या मुलाखतीत सांगितले. पण, त्याच सायंकाळी वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत याबाबत खुलासा करून असा कुठलाही प्रस्वाव आणि नीती शासनासमोर नसल्याचे सांगत बावनकुळे यांनी आधीच्या वृत्ताचे खंडन केले. पण, ही भूमिकाच संशयास्पद असल्याने महाराष्ट्र शासनाने असा कुठला प्रस्ताव मागल्या दाराने कधीच स्वीकारणार नाही, असे आश्वासन देऊन राज्यातील स्त्रियांना आश्वस्त करावे, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांनी केली. 

या विषयावरील आपली भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, या वृत्ताचे खंडन ही बाब स्वागतार्ह आहे; पण संशयाला जागा उरतेच. कारण सोबतच ते म्हणाले की, याबाबत एक अर्ज आमच्याकडे आला आहे. हा अर्ज आणि बावनकुळे यांनी आधी दिलेली मुलाखत या दोन्ही बाबींना एकत्र जोडल्यास शासनाच्या मनात नक्की काय सुरू आहे, याविषयी मनात प्रचंड संशय निर्माण होतो. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेवर आणि खास करून स्त्रियांवर ना. बावनकुळे यांनी टाईमबॉम्बच ठेवलेला आहे. 

आज दारूमुळे जगात दरवर्षी २८ लक्ष मृत्यू होत असल्याचे 'ग्लोबल बर्डन ऑफ डीसीस' या अध्ययनात सांगण्यात आले आहे. एवढेच नाही, तर रोगानिर्मितीच्या प्रमुख १० कारणांमध्ये दारू ही एक आहे. त्यामुळे थोडीशी दारू म्हणजे काही काळाची विश्रांती या गोड गैरसमजात कुणीही राहू नये. 'लांसेट' या जगप्रसिद्ध वैद्यकीय मासिकाच्या म्हणण्यानुसार, दारू पिण्याची कुठलीही सुरक्षित पातळी नाही. ही स्थिती असताना तसेच दारूमुळे दररोज होणारे अपघात पाहता महाराष्ट्र शासनाने अशा प्रस्तावाचा विचार करणे हा प्रकार खूपच धक्कादायक आहे, असे डॉ.अभय व डॉ.राणी बंग यांनी म्हटले आहे. 

सध्या जगभर 'मी टू' ही चळवळ जोर धरत आहे. बलात्कार करणारे, स्त्रियांसोबत असभ्य वर्तन करणारे पुरुष हे बहुधा दारूच्या नशेत असतात, असेही पहावयास मिळते. त्यामुळे दारू घरपोच मिळायला लागल्यास जे रस्त्यावर, कामाच्या ठिकाणी होत आहे; ते घरी व्हायला सुरुवात होईल. लहान मुले दारू पिणाऱ्या वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतील. या निर्णयामुळे 'ड्रंक ड्राईव्ह' मुळे होणारे अपघात कमी होतील असे सांगण्यात येत आहे. पण, माणसे घरूनच पिऊन निघायला लागल्यास दारू पिऊन होणारे अपघात आणखी वाढणार यात शंका नाही. त्यामुळे सर्वच अर्थाने असा प्रस्ताव महाराष्ट्रासाठी अतिशय धोक्याचा आहे. घरपोच दारू म्हणजे घरपोच मृत्यू !

भारतीय जनता पक्षाच्या शासनाने अशा प्रस्तावाचा विचार देखील करावा, याचे आश्चर्य वाटते. आधी मंत्री एका वृत्तपत्राला अशी शासकीय नीती होऊ घातल्याचे सांगत तिचे फायदे विशद करतात आणि नंतर तेच मंत्री असा कुठलाही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नसल्याचे सांगत आपल्याच वृत्ताचे खंडन करतात. त्यामुळे संशय मनात राहतोच की काही राजकीय आणि काही आर्थिक स्वार्थ मिळून अशा प्रकारची नीती शासनासमोर आणण्याचा प्रयत्न होत आहे, अशी टीका बंग दाम्पत्याने केली आहे. 

एक गोष्ट ठामपणे सांगावीशी वाटते की, अशा प्रकारची घरपोच दारू भारतीय संस्कृतीत बसत नाही. कॉंग्रेसच्या तर घटनेतच दारूबंदी आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही पक्षांनी या प्रस्तावाचा निषेध करावा आणि महाराष्ट्राला स्पष्ट आश्वासन द्यावे की 'असा कोणताही प्रस्ताव मागच्या दाराने आम्ही कधीच आणणार नाही' कोणत्याही सरकारने वा पक्षाने असा प्रस्ताव अमलात आणल्यास महाराष्ट्रातील चार कोटी स्त्रियांची मते गमावण्याची तयारी ठेवावी, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.   


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
QHRP1
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना