गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

बहुजन महापुरुषांची बदनामी खपवून घेणार नाही:संभाजी ब्रिगेड

Tuesday, 16th October 2018 05:16:19 AM

गडचिरोली, ता.१६: छत्रपती संभाजी महाराज, संत तुकाराम महाराज व अन्य बहुजन महापुरुषांबाबत आक्षेपार्ह मजकूर छापून ती पुस्तके शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येत आहेत. यातून बाल मनावर खोटा इतिहास बिंबविण्याचा प्रयत्न मनुवादी मंडळी करीत असल्याचे दिसून येत आहे. हा प्रयत्न खपवून घेणार नाही, असा इशारा आज संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

पत्रकार परिषदेला संभाजी ब्रिगेडचे उत्तर गडचिरोली जिल्हाध्यक्ष श्याम भर्रे, दक्षिण गडचिरोली जिल्हाध्यक्ष मारोती दुधबावरे, कार्याध्यक्ष भुवन जुमनाके, जिल्हा सचिव परमानंद पुनमवार, शहराध्यक्ष मयूर मुनघाटे, वासुदेव शेडमाके, विधानसभाप्रमुख विनायक बांदूरकर,  मराठा सेवा संघाचे दादाजी चाफले, प्रा.शेषराव येलेकर, दादाजी चुधरी, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे रुचित वांढरे, प्रा.अशोक वंजारी, प्रमोद बांबोळे उपस्थित होते.

श्याम भर्रे यांनी सांगितले की, सौ.शुभा साठे यांनी 'समर्थ श्री रामदास स्वामी' हे पुस्तक लिहिले असून, त्यात छत्रपती संभाजी राजांबद्दल 'संभाजी राजा दारुच्या कैफात सापडला होता' असा आक्षेपार्ह मजकूर लिहिला आहे. याच पुस्तकातील अन्य मजकूरही निषेधार्ह आहे. या पुस्तकावर सर्व शिक्षा अभियानाचा लोगो असून, ते शालेय विद्यार्थ्याना वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे डॉ.शुभा साठे व पुस्तकाशी संबंधित सर्वांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी भर्रे यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम, छत्रपती संभाजी राजे व अन्य महापुरुष हे महाराष्ट्राची अस्मिता आहेत. परंतु त्यावर घाला घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा भर्रे यांनी दिला.

मारोती दुधबावरे यांनी सांगितले की, संभाजी महाराजांच्या बदनामीबरोबरच संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज व अन्य महापुरुषांचीही बदनामी पुस्तकांद्वारे केली जात आहे. गोपीनाथ तळवलकर यांच्या 'संतांचे जीवनप्रसंग' या पुस्तकात संत तुकाराम महाराजांच्या पत्नीला कुत्र्याची उपमा दिली आहे. तसेच प्र.ग.सहस्त्रबुद्धे यांच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचे श्रेय समर्थ रामदासांना देण्यात आले आहे. बहुजन महापुरुषांबाबत काल्पनिक व चुकीची माहिती सांगून काही लोक खऱ्या इतिहासाची प्रताडणा करीत आहेत, असा आरोप दुधबावरे यांनी केला.

शिवाय गडचिरोली येथील आदर्श शारदा महिला महामंडळाने डॉ.शुभा साठे यांचा 'त्या तिथी' हा कार्यक्रम २१ ऑक्टोबरला आयोजित केला आहे. साठे यांच्या व्याख्यानामुळे शहरात तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा कार्यक्रम रद्द करावा, अशी मागणीही संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली. तसेच याप्रकरणी पोलिसांत तक्रार केल्याची माहिती दिली.

आदर्श शारदा महिला मंडळाने रद्द केला साठेंचा कार्यक्रम

दरम्यान सौ.शुभा साठे यांचा कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिल्यानंतर आदर्श शारदा महिला महामंडळाने आपला २१ तारखेचा नियोजित कार्यक्रम रद्द केला आहे. त्याऐवजी शनिवारी २० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजता रेणुका देशकर यांचा 'भूमी संभवा' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्षांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
80GM6
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना