बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या हवालदारास १० वर्षांचा सश्रम कारावास

Friday, 12th October 2018 01:34:59 AM

गडचिरोली, ता.१२: ओळखीचा फायदा घेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या पोलिस हवालदारास जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांचा सश्रम कारावास व ३ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. प्रमोद देवाजी चापले रा.पोर्ला, ता.गडचिरोली असे दोषी हवालदाराचे नाव असून, तो सिरोंचा पोलिस ठाण्यात नेमणुकीवर होता.

आरोपी पोलिस हवालदार प्रमोद चापले हा सिरोचा येथील पोलिस ठाण्यात नेमणुकीवर होता. त्याची पीडित मुलीच्या वडिलांशी ओळख झाल्याने तो नेहमी तिच्या घरी जात असे. ३१ मार्च २०१५ रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास त्याने ११ वर्षीय पीडित मुलीला शाळेत सोडून देत असल्याचे सांगून आपल्या मोटारसायकलवर बसवले. मात्र, तिला शाळेत नेऊन न देता आरोपी प्रमोद चापले याने तिला आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील सूर्यापल्ली गावाजवळील पुलाखाली नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.

तसेच घटना कुणाला सांगितल्यास गाडीखाली चिरडून ठार करेन, अशी धमकीही त्याने दिली. पीडित मुलीने आपबिती सांगितल्यानंतर तिच्या वडिलांनी सिरोंचा पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यावरुन पोलिसांनी आरोपी प्रमोद चापले यास भादंवि कलम ३७६, ३७७, ५०६, तसेच बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम २०१२ च्या कलम ५,६ आणि अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३(१)(१२), ३(२)(५)अन्वये गुन्हा दाखल केला. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.शिवाजी पवार यांनी तपास पूर्ण केल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

आज या प्रकरणाचा निकाल लागला. सरकारी पक्षाने १२ साक्षदार व पीडित मुलीचे बयाण नोंदविल्यानंतर वैद्यकीय अहवाल व इतर परिस्थितीजन्य पुरावे विचारात घेऊन आणि सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपी प्रमोद चापले यास भादंवि कलम ३७६ व बा.लै.अ.सं अन्वये १० वर्षाचा सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड, कलम ३७७ अन्वये ५ वर्षांचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड आणि भादंवि ५०६ अन्वये १ वर्षाचा सश्रम कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक शरद मेश्राम यांनी जबाबदारी सांभाळली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
6A019
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना