गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गांधी विचारच आमच्या आरोग्यसेवेचा पाया-डॉ. राणी बंग

Thursday, 4th October 2018 06:40:18 AM

गडचिरोली, ता.४ : ३२ वर्षांपासून गडचिरोलीच्या ग्रामीण भागात आम्ही आरोग्य सेवा देत आहोत. या संपूर्ण प्रवासात आदिवासींच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि शारीरिक अडचणी लक्षात घेत, त्या महात्मा गांधीनी दाखविलेल्या स्वराज्याच्या मार्गानेच सोडविण्याचा प्रयत्न आम्ही केला. आजही करतोय. स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्या सोडविताना या विचारांची खूप मदत झाली, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. राणी बंग यांनी गुजरातमधील साबरमती आश्रमात व्याख्यानादरम्यान केले.

महात्मा गांधी यांचा १५० वा जयंतीदिन साबरमती आश्रमात अहिंसा दिवस म्हणून विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. याप्रसंगी 'महात्मा गांधी आणि स्त्रियांचे आरोग्य' या विषयावर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. राणी बंग बोलत होत्या. कार्यक्रमाला गुजरातचे राज्यपाल ओ. पी. कोहली, अमेरिकेचे भारतीय राजदूत केनेथ जस्टर, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल, खा. किरीट सोलंकी, खा. परेश रावल आणि गांधी आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्ष इलाबेन भट्ट यांची उपस्थिती होती. जगभरातील प्रतिष्ठीत मंडळी, पत्रकार कार्यक्रमाला हजर होते. 

व्याख्यानात डॉ. बंग म्हणाल्या, गडचिरोली आणि तेथील आदिवासींविषयी आजही अनेकांच्या मनात मोठे गैरसमज आहेत. पण त्यांच्या अनेक परंपरा समानतेवर आधारित आहेत. चोरी, बलात्कार, हुंडा या विकृती आदिवासी समाजात नाही. कुठलाही आदिवासी केवळ स्वतःचे पोट भरत नाही. समाज ही त्यांची प्राथमिकता असते. त्यामुळे एका अर्थाने गांधींच्या विचारांचे पालन आपल्यापेक्षा आदिवासी समाजच जास्त करीत आहे. गांधींनी सांगितलेल्या ब्रह्मचर्य आणि दारूबंदी या व्रताविषयी असलेल्या गैरसमजांवर भाष्य करताना त्यांनी ती व्रते कशासाठी स्वीकारली, सत्याग्रहींसाठी त्यांचा आग्रह का धरला याविषयी माहिती दिली. या व्रतांमागील स्त्रियांची सुरक्षितता हा गांधीना अभिप्रेत असलेला विचारही त्यांनी यावेळी सांगितला. गांधींच्या १५० व्या जयंतीदिनी साबरमती आश्रमात मिळालेली बोलण्याची संधी हा माझ्यासाठी आतापर्यंतचा सर्वोच्च सन्मान असल्याचे त्या म्हणाल्या. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
F4150
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना