गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

१५ वर्षांनंतर झाली नक्षलग्रस्त मोठा झेलिया गावात निवडणूक, उच्चशिक्षित युवक झाला सरपंच

Thursday, 13th September 2018 07:46:04 AM

नंदकिशोर वैरागडे/कोरची,ता.१३: अधिकाऱ्यांनी थेट लोकांमध्ये जाऊन आपले कर्तव्य चोखपणे बजावले तर परिवर्तन होऊ शकते, याचा प्रत्यय एका गावात नुकताच आला. तहसीलदार पुष्पलता कुमरे यांनी थेट गावात जाऊन लोकांना ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रवृत्त केले. निवडणूक झाली आणि गावाला मिळाला एक उच्चशिक्षित सरपंच. कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धडा घ्यावा आणि एका महिला अधिकाऱ्याने 'गूड गव्हर्नन्स' काय असते, याचा वस्तुपाठ घालून द्यावा, अशी ही आनंदाची वार्ता मोठा झेलिया गावातून आली आहे.

मोठा झेलिया हे गाव कोरची तालुकास्थळापासून ४० किलोमीटर अंतरावर आहे. धानोरा तालुक्यातील मुरुमगाव येथूनही तेथे जाता येते. कटेझरीनंतर मोठा झेलियाला जाण्यासाठी रस्ताच नाही. खाचखडगे आणि जंगलातून पायवाट काढत गेल्यानंतर गर्द झाडीत मान दुमडल्यागत हे गाव वसलेले आहे. संपूर्ण गाव आदिवासीबहुल. नक्षल्यांची सदैव दहशत. १७ ऑक्टोबर २०१३ रोजी गावातील जिल्हा परिषद शाळेत नक्षलविरोधी अभियानावर असलेले पोलिस मुक्कामी होते. ही संधी साधून नक्षल्यांनी भूसुरुंगस्फोट घडविला आणि तीन जवानांना शहीद व्हावे लागले होते. या घटनेपूर्वीही नक्षल्यांनी येथे हत्या केल्या होत्या. 

१५ वर्षांपूर्वी पोलिसांचा खबऱ्या म्हणून तेथील सरपंचाला नक्षलवाद्यांनी ठार केले होते. तेव्हापासून भीतीपोटी मोठा झेलिया ग्रामपंचायतीची निवडणूकच झाली नव्हती.

परिसरात वीज नाही, रस्ते नाहीत, आरोग्याच्या सोयी नाहीत. गावकऱ्यांनासूद्धा बाहेरच्या जगाशी काही देणे-घेणे नाही.  शासनाच्या योजनांविषयी त्यांना कोणत्याही प्रकारची माहितीदेखील नाही. परिसरातील २०-२५ गावांची हीच स्थिती आहे. तरीही तेथील आदिवासी आपल्यातच खूश आहेत. अशा या परिसरात आजपर्यंत कोणताच अधिकारी गेला नाही, की तेथील समस्याही जाणून घेतल्या नाहीत.

अशातच मागच्या वर्षी पुष्पलता कुमरे ह्या कोरची येथे तहसीलदार म्हणून रुजू झाल्या. महिला असूनही त्यांनी सर्वप्रथम अतिदुर्गम गावांना भेटी देऊन तेथील नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. मोठा झेलिया,रानकट्टा,पिटेसूर इत्यादी गावांत जाऊन त्यांनी लोकांशी जवळीक साधली. यंदा मार्च महिन्यात त्या गावांत गेल्या होत्या आणि आता २ सप्टेंबरला पुन्हा त्या मोठा झेलिया, पिटेसूरला जाऊन आल्या. त्यांनी गावात २६ सप्टेंबरला ग्रामपंचायतीची निवडणूक असल्याचे सांगितले. परंतु नक्षल दहशतीमुळे कुणी उभा राहण्यास धजावेना. तहसीलदार पुष्पलता कुमरे यांना गांगसाय मडावी हा उच्चशिक्षित युवक शेजारच्या न्याहाकल गावात असल्याचे कळले. कुमरे यांनी गांगसाय मडावी याच्याशी चर्चा करुन त्यास सरपंच पदासाठी अर्ज करण्यास प्रवृत्त केले. त्याने अर्ज केला. एकमेव अर्ज असल्याने तो अविरोध निवडूनही आला. गांगसाय मडावी हा एम.ए.बी.एड असून बेरोजगार आहे. आज मडावी हा कोरची तालुक्यातील सर्वात उच्चशिक्षित सरपंच आहे.७ सदस्यीय मोठा झेलिया ग्रामपंचायतीत ३ सदस्य अविरोध निवडून आले आहेत. .

याच परिसरातील पिटेसूर ग्रामपंचायतचीसुद्ध निवडणूक झाली नव्हती. चैनुराम गांडोराम ताडामी यांचा एकमेव अर्ज असल्याने तेही अविरोध निवडून आले. 

कागदपत्रे नसल्याने लढवू शकले नाही निवडणूक

दुर्गम आदिवासीबहुल भागातील लोक अल्पशिक्षित आहेत. त्यामुळे निवडणूक वा अन्य योजनांसाठी कोणती कागदपत्रे लागतात आणि ती कुठून मिळवावी लागतात, याची त्यांना पुरेशी जाणीव नाही. प्रशासनाची लेटलतिफशाही त्यांना सहकार्य करीत नाही.

त्यामुळे मोठा झेलिया गटग्रामपंचायतीमध्ये कागदपत्रांच्या अडचणीमुळे ४ पदे रिक्त राहिली आहेत, तर ९ सदस्यीय पिटेसूर ग्रामपंचायतमध्ये २ पदे रिक्त आहेत. आता इच्छुकांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे लागणार आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
EV10G
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना