शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

...अन् ट्रॅक्टरवरच झाली 'त्या' महिलेची प्रसूती!

Sunday, 9th September 2018 10:24:37 PM

भामरागड, ता.१०: चांगले रस्ते नसल्याने नागरिकांचे कसे हाल होतात, याचा प्रत्यय काल(ता.९)भामरागड तालुक्यातील हितापाडी येथे आला. प्रसूतीसाठी एका महिलेला जवळच्या रुग्णालयात भरती करावयाचे होते. परंतु गावाला जाण्यासाठी रस्ताच नसल्याने तिला ट्रॅक्टरने कसेबसे रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, वाटेतच तिची प्रसूती झाली.

त्याचे झाले असे की, भामरागड तालुका मुख्यालयापासून १३ किलोमीटर अंतरावर हितापाडी हे गाव आहे. आरेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत या गावाचा समावेश होतो. या गावातील शांती राकेश पुंगाटी या महिलेला रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास प्रसूती कळा सुरु झाल्या. ही माहिती आरेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना देण्यात आली. तिला आणण्यासाठी कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिका पाठवली. परंतु हिदूर गावापासून हितापाडी गावापर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही. आहे ती केवळ पायवाट. शिवाय नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे पायवाटदेखील चिखलव्याप्त आणि खड्डेमय झाली आहे. त्यामुळे रुग्णवाहिका गावापर्यंत नेणे शक्य होत नव्हते. परंतु प्रसवकळा वाढल्याने शांतीला तत्काळ रुग्णालयात भरती करणे आवश्यक होते. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी समयसूचकता दाखवत ट्रॅक्टर बोलावला. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर शांतीला झोपविण्यात आले. यावेळी डॉक्टर आणि परिचारिकाही सोबत होत्या. जंगल, खड्डे आणि चिखलातून मार्ग काढत ट्रॅक्टर आरेवाडा गावाच्या दिशेने जात होता. मात्र, खड्ड्यांमुळे लागणाऱ्या झटक्यांनी शांतीने वाटतेच गोंडस बाळाला जन्म दिला. डॉक्टर व परिचारिका असल्याने प्रसूती सुरळीत पार पडली. महिला आणि बाळाची प्रकृती व्यवस्थित आहे. 

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मिलिंद मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली आरेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ.सुचिता दांडगे, परिचारिका भारती, सपना, कुमरे, वाहनचालक पिंटूराज मंडलवार, एमपीडब्लू चिलबुले यांनी ही प्रक्रिया पार पाडली. या सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. २९ जुलैला कुरखेडा तालुक्यातील कोटलडोह येथील सिकलसेलग्रस्त एक गर्भवती महिला प्रसूतीस विलंब होत असल्याने रुग्णालयातून गावाला परत गेली होती. त्यावेळी तहसीलदारांसह डॉक्टर व अख्खे प्रशासनच तिच्या प्रसूतीसाठी गुडघाभर पाण्यातून गावात गेले होते. त्यानंतर आज आरेवाडा येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी कर्तव्यतत्परता दाखविली. जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी ही तत्परता कायम ठेवली, तर आरोग्य सेवा नक्की सुधारेल, असा विश्वास नागरिकांना आता वाटू लागला आहे.

चांगले रस्ते होणार की नाही?

एकीकडे सरकार मोठ्या शहरांमधून कोट्यवधी रुपये खर्च करुन सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार करीत आहे. परंतु दुर्गम भागातील नागरिकांना मात्र रस्त्याअभावी जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे. मग ती कोटलडोहची महिला असो की, हितापाडीची शांतीबाई पुंगाटी. रस्त्यांमुळे त्यांचा जीव गेला असता. मात्र, डॉक्टरांनी त्यांना वाचविले. अशावेळी संतापलेले नागरिक शहरातून हायवे बनविण्यापेक्षा दुर्गम भागात चांगले रस्ते का करीत नाही, असा प्रश्न सरकारला विचारु लागले आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
LV24M
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना