गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

डॉ. बंग दाम्पत्याला फिक्कीचा 'हेल्थकेअर ह्युमनिटेरियन' पुरस्कार

Thursday, 30th August 2018 07:33:40 AM

गडचिरोली,ता.३०: जिल्ह्यातील आदिवासींच्या आरोग्यासाठी निष्काम भावनेतून काम करणाऱ्या डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग दाम्पत्याला फेडरेशन ऑफ इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री(फिक्की) म्हणजेच भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाच्याच्या वतीने दिल्या जाणाऱ्या 'हेल्थकेअर ह्युमनिटेरियन' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आज दिल्ली येथे 'फिक्की'द्वारे आयोजित दहाव्या 'हेल्थकेअर एक्सिलंस' पुरस्कार व परिषदेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आरोग्यसेवेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी २००९ पासून भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाद्वारे 'हेल्थकेअर एक्सिलंस' पुरस्काराला सुरुवात करण्यात आली. दशकभरापासून हा वारसा पुढे जात आहे. यंदाचे या पुरस्काराचे दहावे वर्ष आहे. आदिवासी भागात केवळ आरोग्यसेवाच न देता, त्यांच्या आरोग्याच्या समस्या कशा कमी करता येतील, यासाठी सातत्याने संशोधन करण्याचे काम डॉ. बंग दाम्पत्य ३२ वर्षांपासून करीत आहे. भारतातील सार्वजनिक आरोग्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली आहे. दुर्गम आणि ग्रामीण भागातील नवजात बाळांना आरोग्यसेवा, बालमृत्यू आणि स्त्री आरोग्याच्या समस्या याबाबत त्यांनी तयार केलेला उपक्रम आज देशातील विविध राज्ये व पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश आणि अनेक आफ्रिकन देशांमध्ये राबविण्यात येत आहे. याच कार्याची दाखल घेत डॉ. बंग दाम्पत्याला उपरोक्त पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दोघांच्या वतीने डॉ. अभय बंग यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

महासंघाचे सरचिटणीस दिलीप चिनॉय, कोकिलाबेन रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्राच्या अध्यक्ष टीना अंबानी, केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल आणि दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर अनिल बैजल यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

दारू आणि तंबाखू हे आरोग्याविरोधी

भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ ही देशातील सर्वात मोठी व्यवसाय संस्था आहे. त्यामुळे या संस्थेद्वारे घेतल्या जात असलेल्या प्रत्येक निर्णयाला एक वजन असते. दारू आणि तंबाखू या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी अपायकारक असूनही त्यांचा व्यवसाय भारतात सर्वत्र फोफावत आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात 'सर्च' च्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या 'मुक्तिपथ' या उपक्रमाबाबत माहिती देतानाच महासंघाची दारू आणि तंबाखूबाबत काय भूमिका असावी यावर डॉ. अभय बंग हे शुक्रवारी याच सोहळ्यात आयोजित 'हेल्थकेअर एट क्रॉसरोड' या कार्यक्रमात आपली भूमिका मांडणार आहेत.

बंग दाम्पत्याला आजवर मिळालेले पुरस्कार

डॉ.बंग दाम्पत्याला २००३ मध्ये राज्य शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने त्यांना डी.लीट.ही पदवीही बहाल केली आहे. २०१६ मध्ये अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने 'डिस्टींग्विश्ड अॅलुम्नस' हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. २६ जानेवारी २०१८ रोजी केंद्र शासनाने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवान्वित केले. . 'माझा साक्षात्कारी हृदयरोग' हे त्यांचे गाजलेले पुस्तक असून,'द लॅनसेट' या वैद्यकीय नियतकालिकात त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
LU044
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना