गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

लोहप्रकल्पासाठी एमआयडीसीने लॉयड मेटल्सला हस्तांतरित केली जमीन

Friday, 24th August 2018 08:01:05 AM

गडचिरोली, ता.२४: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर बहुप्रतीक्षित कोनसरी येथील लोहप्रकल्पासाठी आवश्यक असलेली जमीन आज एमआयडीसीने लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीला हस्तांतरित केली आहे. कोनसरी येथे होणाऱ्या लोहप्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला असून, सुमारे ८०० सुशिक्षित बेरोजगारांना प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.

एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील पहाडावरील लोहखनिजाची लीज मिळाल्यानंतर लॉयड मेटल्स कंपनीने चामोर्शी तालुक्यातील आष्टीनजीकच्या कोनसरी येथे लोहप्रकल्प उभारण्याची घोषणा केली होती. त्याअनुषंगाने लॉयडने जवळपास ३५ शेतकऱ्यांची सुमारे ५०.२९ हेक्टर शेतजमीन संपादित करुन जमिनीच्या एकूण किमतीच्या १० टक्के रक्कम २६ एप्रिल २०१७ रोजी धनादेशाद्वारे एमआयडीसीला दिली होती. एमआयडीसीने ही रक्कम शेतकऱ्यांना दिली. त्यानंतर १२ मे २०१७ रोजी कोनसरी येथे प्रस्तावित लोहखनिज प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळीही प्रातिनिधीक स्वरुपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना धनादेश वितरीत करण्यात आले होते. त्यानंतर १५ एप्रिल २०१८ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: गडचिरोली उर्वरित शेतकऱ्यांना धनादेश दिले होते.

तत्पूर्वी ७ फेब्रुवारी २०१८ रोजी एमआयडीसीने संबंधित शेतकऱ्यांना जमिनीच्या मोबदल्यात रक्कम देण्याविषयीचे पत्र लॉयड मेटल्स कंपनीला दिले. या पत्राची दखल घेत लॉयड मेटल्स कंपनीने ८ फेब्रुवारी २०१८ रोजी तत्काळ ६ कोटी १ लाख ६९ हजार ८१८ रुपये एमआयडीसीकडे आरटीजीएस केले. 

त्यानंतर फेब्रुवारी २०१८ मध्ये मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत  'मॅग्नेटिक महाराष्ट्र' परिषद झाली. या परिषदेत राज्य सरकार व लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार झाला. या करारानुसार, लॉयड मेटल्स कंपनी कोनसरी येथे ७०० कोटी रुपयांचा प्रकल्प उभारणार असून, त्यातून सुमारे ८०० सुशिक्षित बेरोजगारांना प्रत्यक्षात रोजगार मिळणार आहे. प्रकल्पाचे पहिल्या टप्प्यातील काम जून २०२० पर्यंत होणार असून, उर्वरित काम २०२७ पर्यंत पूर्ण होणार आहे.

एकीकडे लॉयड मेटल्स कंपनी उद्योग उभारण्यास तयार असताना काही अडचणींमुळे एमआयडीसीने जमीन या कंपनीला हस्तांतरित केली नव्हती. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३ ऑगस्टला व्हीडीओ कॉन्फरंस घेऊन प्रशासनाला तत्काळ सर्व प्रकारच्या परवानग्या देण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाची दखल घेत एमआयडीसीने आज लॉयड मेटल्स अॅंड एनर्जी लिमिटेडला ५०.२९ हेक्टर आर जमीन हस्तांरित करीत असल्याचे पत्र दिले आहे. विशेष म्हणजे, प्रकल्प झाल्यास लॉयड मेटल्स कंपनी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येक सातबारावर एकाला नोकरी देणार आहे, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

यामुळे लवकरच कोनसरी येथील लोहप्रकल्पाच्या कामाला सुरुवात होऊन बेरोजगारांना रोजगारांची संधी मिळेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
154RG
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना