बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

वैभव राऊत कुणावर बॉम्ब टाकणार होता, याचा खुलासा व्हावा: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

Saturday, 18th August 2018 07:15:47 AM

गडचिरोली, ता.१८: दाभोळकर, पानसरे, कलबुर्गीच्या हत्येतील आरोपी अजून सापडले नाहीत. अशातच सनातन संस्थेशी संबंधित असणाऱ्या वैभव राऊतला अनेक बॉम्बसह पोलिसांनी अटक केली. विचारवंतांच्या हत्येनंतर वैभव राऊत कुणावर बॉम्ब टाकणार होता याचा खुलासा तपास यंत्रणेने करावा, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीसाठी जयंत पाटील आज गडचिरोलीत आले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री अनिल देशमुख, आ.प्रकाश गजभिये, ज्येष्ठ नेते सुरेश सावकार पोरेड्डीवार, राष्ट्रवादीच्या ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे, राकाँचे प्रभारी जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, चंद्रपूरचे नेते राजेंद्र वैद्य, मो.युनुस शेख, जिल्हा परिषद सदस्य जगन्नाथ बोरकुटे उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, वैभव राऊतला अनेक बॉम्बसह पकडण्यात आले. आता त्याच्या समर्थनार्थ मोर्चे काढून तपास यंत्रणांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा दबाव भाजप समर्थकांकडून टाकण्यात येत आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी विकासाचा मुद्दा घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. आता मोदी नेमका कोणता कार्यक्रम घेऊन जनतेपुढे जाणार आहेत, असा सवाल श्री.पाटील यांनी केला.

बोफोर्स घोटाळ्यापेक्षा दहा पटींनी रॉफेल घोटाळा आहे. या विमानांचे सुटे भाग बनविण्याचे काम हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीला मिळाले होते. मात्र, ते डावलून अंबानीच्या कंपनीला देत आले, असा घणाघाती आरोप जयंत पाटील यांनी केला. सिंचन घोटाळ्यात आमच्यावर एकही आरोप सिद्ध झाले नाही. दुसरीकडे छगन भुजबळ या बहुजन समाजाच्या नेत्याला आरोप सिद्ध न होताही कारागृहात टाकण्यात आले. व्ही.पी.सिंग यांनी मंडल आयोग लागू केल्यावर भाजपने त्यांचे सरकार पाडले होते. आता आरक्षणाला विरोध केला जात आहे. ओबीसी समाज या गोष्टी विसरणार नाही. राज्यघटना जाळणारे लोक आरक्षणविरोधी घोषणा देत होते. आधी रस्त्यावर ट्रायल घ्यायची आणि नंतर तो कार्यक्रम कृतीत उतरवायचा असे भाजपचे धोरण आहे. जेएनयूमध्ये गडबड करणाऱ्यांवर कारवाई होते. मात्र, संविधान जाळणाऱ्यांवर कारवाई होत नाही, याचे ओरखडे लोकांच्या मनावर पडले आहेत. याचे परिणाम सत्ताधाऱ्यांना भोगावे लागतील, असा इशारा जयंत पाटील यांनी दिला.

येत्या काही महिन्यांत चार राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये स्पष्ट् पराभव दिसत असल्यानेच भाजप लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याचा डाव आखत आहे, अशी टीका पाटील यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मरगळ आली असली तरी पुन्हा नव्या जोमाने पक्षाला उभारी देऊ, असा विश्वास व्यक्त करुन जयंत पाटील यांनी प्रत्येक बूथवर कार्यकर्त्यांची फौज निर्माण करण्याचे काम सुरु असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
L7E0A
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना