गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

आरेवाडा ग्रामपंचायत व मन्नेराजारामच्या शाळेत नक्षल्यांनी फडकविले काळे ध्वज

Tuesday, 14th August 2018 11:47:59 PM

गडचिरोली, ता.१५: संपूर्ण देश आज स्वातंत्र्यदिन साजरा करीत असताना काल(ता.१४)रात्री नक्षल्यांनी 'यह आझादी झुठी है' असे म्हणत भामरागड तालुक्यातील आरेवाडा ग्रामपंचायत व मन्नेराजाराम येथील शाळेत काळे ध्वज फडकविले.

आरेवाडा हे गाव भामरागड तालुका मुख्यालयापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावर आहे. स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी काल दुपारी ग्रामपंचायत प्रशासनाने परिसराची स्वच्छता करुन रंगरंगोटी केली. मात्र, रात्री काही नक्षली गावात आले आणि त्यांनी पटांगणावरील खांबावर काळा ध्वज फडकविला. बाजूला नक्षल्यांनी एक मोठे बॅनरही बांधले होते. '१५ ऑगस्ट की आझादी झुठी है. १९४७ के आझादी का बहिष्कार करो. ब्राम्हणीय हिंदू फांसीवाद दमन जनता के उपर जारी है, जो कानून के हिसाब से अधिकार के लिए संघर्ष करते है, उन्हे आतंकवादी, उग्रवादी, नक्षलवादी कहके जेल मे डालते है', असा मजकूर बॅनरवर लिहिला होता. आज सकाळी काळा ध्वज दिसताच पोलिसांना माहिती देण्यात आली. काळा ध्वज उतरविल्यानंतर आज सकाळी दहशतीच्या वातावरणातच राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. 

आरेवाडा गावाशिवाय भामरागडपासून सुमारे २६ किलोमीटर अंतरावरील मन्नेराजाराम येथील शाळेतही नक्षल्यांनी काळा ध्वज फडकविला. आज सकाळी काळा ध्वज काढून राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. यामुळे तेथेही स्वातंत्र्यदिन कार्यक्रमावर दहशतीचे सावट होते. गेल्या दोन-तीन वर्षांपासून काळे ध्वज फडविण्याचा प्रकार नक्षल्यांनी जवळपास बंद केला होता. परंतु यंदा दुर्गम भागात हा प्रकार पुन्हा दिसून आला.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
9XRA4
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना