शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

गोंडवाना विद्यापीठात आदिवासी अध्यासन सुरु करा:आ.बंटी भांगडिया, अॅड.संजय धोटे यांची मागणी

Tuesday, 14th August 2018 12:01:02 AM

गडचिरोली, ता.१४: आदिवासींच्या बोलीभाषा, त्यांची संस्कृती व अन्य बाबींचा अभ्यास करण्यासाठी गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात आदिवासी अध्यासन सुरु करण्याची मागणी चिमूरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया व राजुऱ्याचे आमदार अॅड.संजय धोटे यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

सुप्रसिद्ध कवी व साहित्यिक प्रभू राजगडकर यांनी गोंडवाना विद्यापीठात आदिवासी अध्यासन सुरु करण्याची मागणी मुख्यमंत्री व राज्यपालांकडे केली होती. त्यानंतर यंदा मार्च महिन्यात महामहीम राज्यपाल तथा कुलपतींच्या सचिवांनी गोडवाना विद्यापीठाच्या कुलगुरुंना एक पत्र पाठवून पुढील कार्यवाही करण्याचे आदेशित केले होते. परंतु त्यावर कुठलाच निर्णय झाला नाही. त्यामुळे श्री.राजगडकर यांनी आ.कीर्तिकुमार भांगडिया, आ.अॅड.संजय धोटे व अन्य आमदार महोदयांना निवेदन देऊन मागणी रेटून धरली होती.

श्री.राजगडकर यांच्या पत्राची दखल घेत आ.भांगडिया यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना एक पत्र पाठविले आहे. बहुसंख्य आदिवासी जनतेच्या मागणीवर शासनाने गडचिरोली येथे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक हितास्तव गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती केली आहे. या विद्यापीठात आदिवासी अध्यासन निर्माण करण्याविषयीचे प्रभू राजगडकर यांचे स्पयंस्पष्ट निवेदन प्राप्त झाले आहे.

या निवेदनानुसार गोंडवाना विद्यापीठात आदिवासी अध्यासन सुरु झाल्यास आदिवासींच्या बोलीभाषा, आदिवासी संस्कृती, मानवी व्यवहार व आधुनिकता, तसेच आदिवासींच्या विकासाच्या संकल्पना आणि त्यांच्यात अवगत असलेल्या विविध कला यांचा शास्त्रीय अभ्यास, जल-जंगल-जमीन, आदिवासींमधील स्थापत्य कला, आयुर्वेदशास्त्र व अन्य विषयांवर अभ्यास करणे देशी-विदेशी विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना सोयीचे होईल. त्यासाठी गोंडवाना विद्यापीठात आदिवासी अध्यासन सुरु करावे, अशी मागणी आ.कीर्तिकुमार भांगडिया यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे. अध्यासनाच्या मागणीसंदर्भात बरेच पत्रव्यवहार करण्यात आले असतानाही प्रकरण प्रलंबित ठेवल्याकडे आ.भांगडिया यांनी शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

अशाचप्रकारची मागणी करणारे पत्र राजुरा येथील आमदार अॅड.संजय धोटे यांनीही मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.

आदिवासी अध्यासनाच्या मागणीकडे आदिवासी आमदारांचेच दुर्लक्ष

गोंडवाना विद्यापीठात आदिवासी अध्यासन सुरु करावे, अशी मागणी करणारे पत्र प्रभू राजगडकर यांनी विदर्भातील बहुतांश आमदारांना दिले होते. त्यात आदिवासी आमदारांचाही समावेश होता. परंतु एकाही आदिवासी आमदाराने ही मागणी लावून धरली नाही. उलट गैरआदिवासी असलेल्या आ.भांगडिया व आ.धोटे यांनी मात्र मागणी रेटून आदिवासींच्या शैक्षणिक विकासाचे महत्व अधोरेखीत केले, त्याबद्दल त्यांचे कौतूक होत आहे. दुसरीकडे आदिवासींच्या विकासाबाबत उदासीन असलेल्या आदिवासी आमदारांबद्दल समाजात नाराजीचा सूर उमटत आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
6S8AU
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना