गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

पर्लकोटा नदीला पूर, भामरागड तालुक्यातील शंभर गावांचा संपर्क तुटला

Saturday, 11th August 2018 11:59:57 PM

गडचिरोली,ता.१२: कालपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीला पूर आला असून, पुलावरुन ३ फूट पाणी वाहू लागल्याने तालुक्यातील शंभर गावांचा संपर्क तुटला आहे.

मागील पंधरा-वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाला होता. धानपिकाची रोवणी केलेल्या शेतकऱ्यांना दुसऱ्या स्त्रोतामधून पाणी आणून पीक वाचविण्याची धडपड करावी लागली, तर ज्यांची रोवणी करावयाची होती, त्यांच्यापुढे दुष्काळाचे सावट उभे राहिले होते. मात्र, परवाच्या रात्रीपासून जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले. काल रात्री सर्वत्र दमदार पाऊस पडला. भामरागड तालुक्यातील ताडगाव येथे सर्वाधिक २२६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल भामरागड येथे २०७ मिलिमीटर, अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथे १४७.४ मिलिमीटर,  सिरोंचा तालुक्यातील बामणी येथे १३९ मिलिमीटर, एटापल्ली तालुक्यातील गट्टा येथे १२३.२ मिलिमीटर व कसनसूर येथे १२२.६ मिलिमीटर पाऊस पडला. भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीच्या पुलावरुन काल रात्री ३ फूट पाणी वाहत होते. पहाटेला पूर ओसरला. परंतु आज सकाळी पुन्हा पुलावरुन पाणी वाहू लागले. हेमलकसा गावाच्या अलिकडे असलेल्या कुमरगुडा येथील नाल्यालाही पूर आला आहे. त्यामुळे त्या भागातील शंभर गावांचा संपर्क तुटला होता. सिरोंचा तालुक्यातील बामणी-टेकडाताला मार्गाचा संपर्क तुटला आहे. चामोर्शी तालुक्यातील दिना नदी, कुरखेड्यातील सती नदी, गडचिरोलीनजीकची कठाणी नदी, पोटफोडी नदी व आरमोरीनजीकची गाढवी नदी व अन्य नाले दुथडी भरुन वाहत आहेत. यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
D3H65
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना