शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

...अन् गुरुजींनी शेतावर जाऊन शोधले शाळाबाह्य विद्यार्थी!

Friday, 3rd August 2018 08:35:25 AM

गडचिरोली, ता.३: सर्वाना मोफत शिक्षण, हे शासनाचे धोरण आहे आणि सर्वांना शिक्षणाचा अधिकारही आहे. परंतु पराकोटीचे दारिद्र्य व पालकांचे अज्ञान यामुळे मध्येच शाळा सोडून जाण्याचे विद्यार्थ्यांचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. मात्र, भामरागडच्या काही जांबाज गुरुजींनी चक्क -शेतावर जाऊन शाळाबाह्य विद्यार्थी शोधले आहेत.

हो, हे खरे आहे. जिल्ह्याच्या एका कोपऱ्यात असलेला भामरागड तालुका दुर्गम व नक्षलग्रस्त आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. या तालुक्यातील बहुतांश गावेही अतिदुर्गम आहेत. धड रस्ते नाहीत, एसटीची सोय नाही आणि गावात विजेचा पत्ता नाही, अशी अनेक गावे आहेत. बोटनफुंडी हे एक असेच गाव. भामरागडपासून २३ किलोमीटर अंतरावर. परिसरात केव्हा कानठळ्या बसणारा आवाज येईल, हे सांगता येत नाही. भामरागडच्या गटसाधन केंद्रातील साधन व्यक्ती चांगदेव सोरते, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या शिक्षिका कु.एम.पी.कंडे हे गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोधात निघाले. भटकंती करता करता त्यांना बोटनफुंडी गावात काही विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचे कळले. आता त्यांना शाळेत घालायचेच, असा निर्धार चांगदेव सोरते व कु.कंडे यांनी केला. 

त्यासाठी दोघेही सर्वप्रथम १८ जुलैला बोटनफुंडी गावात पोहचले. तेथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हरिदास मेश्राम व सहायक शिक्षक श्री.आलाम यांना ते भेटले. त्यांच्यासमवेत ते रोशनी बंडू मडावी, आंचल सोमजी मडावी व मनिषा मथ्थू मडावी या विद्यार्थिंनीच्या घरी पोहचले. या तिघींनीही दोनं वर्षांपासून शाळा सोडली आहे. शिक्षकांनी त्यांच्या आई-वडिलांची भेट घेऊन मुलींना शाळेत पाठविण्याची विनंती केली. शिक्षणाचे महत्त्व, मुलींचे भविष्य व शासनाच्या योजनांची माहितीही त्यांनी समजावून सांगितली. पण, आई-वडिलांच्या मनात उजेड पडला नाही. शिक्षक माघारी फिरले. पण, त्यांनी निर्धार सोडला नाही.

पुन्हा ३१ जुलैला चांगदेव सोरते आणि कु.कंडे हे बोटनफुंडीला पोहचले. तेथील शिक्षकांना घेऊन त्यांनी तिन्ही मुलींचे घर गाठले. त्यांनी दुसऱ्यांदा त्यांच्या आई-वडिलांशी संवाद साधून मुलींना शाळेत दाखल करण्याची विनंती केली. संवादानंतर आता थोडी आशा पल्लवीत झाल्याने सकारात्मक विचाराने सोरते आणि कंडे परत आले. 

आज ३ ऑगस्टला पुन्हा त्याच निर्धाराने दोघेही बोटनफुंडी गावात पोहचले. बघतात तर काय? .तीनपैकी एकही मुलगी घरी नाही. त्या शेतावर गेल्याचे शिक्षकांना कळले. मग, चिखल तुडवीत सोरते, कु.कंडे, मेश्राम, आलाम हे शेतावर पोहचले. तेथे या मुली आई, वडिलांसमवेत बांध साफ करण्याच्या कामात व्यस्त होत्या. एका मुलीची आई चक्क शेतात नांगरणी करीत होती. शिक्षकांनी बांधावरच पुन्हा शिक्षणाचे महत्त्व सांगितले. आता ह्या तिन्ही मुलींनी शाळेत येण्याचा मानस व्यक्त केला. त्यांच्या आई-वडिलांनीही त्यास होकार दिला. परिश्रमाचे चीज झाल्याचे समाधान घेऊन सोरते, कंडे भामरागडला आले. पुढच्या बुधवारी ते तिन्ही विद्यार्थिनींना भामरागडच्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात दाखल करणार आहेत. 

१२ वर्षीय रोशनी मडावी हिने दोन वर्षांपूर्वी चौथीपासून शाळा सोडली आहे. मनिषा मडावी व आंचल मडावी यांचीही तीच परिस्थिती आहे. परंतु आता साधन व्यक्ती आणि शिक्षकांच्या परिश्रमामुळे त्यांना एका चांगल्या शाळेत शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.

खरे तर शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार प्रत्येकाला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. एखादा विद्यार्थी वर्षभर शाळेत आला नाही, तर त्याला शाळाबाह्य विद्यार्थी म्हटले जाते. तसेच एखादा विद्यार्थी ३० दिवसांपेक्षा जास्त दिवस शाळेत गैरहजर राहिल्यास तोही शाळाबाह्य समजला जातो. एप्रिल महिन्यापर्यंत अशा शाळाबाह्य विद्यार्थ्याना शाळेत दाखल करुन घेता येते. परंतु एकदा का शाळा सुरु झाली की, कुणी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्याच्या भानगडीत पडत नाही. मात्र, चांगदेव सोरते आणि कु.कंडे यांनी केलेले काम नक्कीच प्रशंसनीय आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
40QDH
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना