शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे जिल्हावासीयांचे लक्ष

Saturday, 18th October 2014 08:11:55 AM

 
गडचिरोली, ता़१८
१५ आॅक्टोबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवारी १९ आॅक्टोबर रोजी होणार असून, निकालाबाबत जिल्हावासीयांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे़ 
रविवारी सकाळी ८ वाजतापासून जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्रांमध्ये मतमोजणीस सुरुवात होणार असून, दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत निकाल जाहीर होतील, अशी अपेक्षा आहे़ मतमोजणीच्या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे़ या  निवडणुकीत जिल्ह्यात सरासरी ६६.१६ टक्के मतदान झाले. यामध्ये आरमोरी मतदारसंघात सर्वाधिक ७१.९० टक्के, अहेरी मतदारसंघात ७० टक्के आणि गडचिरोली मतदारसंघात सर्वांत कमी ५८.२४ टक्के मतदान झाले. आरमोरी विधानसभा मतदारसंघातील २ लाख ३८ हजार ६९२ मतदारांपैकी १ लाख ७१ हजार ६१४ मतदारांनी मतदान केले. अहेरी विधानसभा मतदारसंघात एकंदरीत २ लाख १५ हजार ३१३ मतदार असून त्यापैकी १ लाख ५० हजार ७४७ उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला. 
 गडचिरोली मतदारसंघात एकंदरीत २ लाख ७७ हजार मतदारांपैकी केवळ १ लाख ६१ हजार ३७० मतदारांनी मतदान केले. गडचिरोली मतदारसंघात आरमोरी व अहेरी मतदारसंघापेक्षा कमी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघांत एकंदरीत ३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आरमोरी विधानसभा मतदारसंघात १४, गडचिरोली मतदारसंघात १३ आणि अहेरी मतदारसंघात ९ उमेदवारांनी निवडणूक लढविली़ या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला उद्या होणार आहे.
मतमोजणीसाठी निवडणूक विभागाने जय्यत तयारी केली आहे. मतमोजणीसाठी प्रत्येकी १४ टेबल लावण्यात येणार आहेत. त्यासाठी २०० अधिकारी व कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. आरमोरी विधानभा मतदारसंघाची मतमोजणी देसाईगंज येथील तहसील कार्यालयात, अहेरी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी आलापल्ली जवळील नागेपल्ली येथील औद्यौगीक प्रशिक्षण संस्थेत, तर गडचिरोली मतदारसंघाची मतमोजणी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत करण्यात येणार आहे. कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी मतमोजणी केंद्र परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
गडचिरोली विधानसभा क्षेत्रात मुख्य लढत शिवसेनेचे केशरी उसेंडी, बसपाचे विलास कोडापे व भाजपाचे डॉ़ देवराव होळी यांच्यात होईल, अशी चर्चा आहे़ आरमोरी क्षेत्रात काँग्रेसचे विद्यमान आमदार आनंदराव गेडाम, भाजपाचे क्रिष्णा गजबे व शिवसेनेचे डॉ़ रामकृष्ण मडावी यांच्यात चुरस राहील, तर अहेरी विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी कॉग्रेसचे धर्मरावबाबा आत्राम, भाजपाचे राजे अम्ब्रिशराव महाराज व अपक्ष उमेदवार दीपक आत्राम यांच्यात मुकाबला रंगणार आहे़ यांच्यापैकी कोण निवडून येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, अनेक जण पैज लावण्यात व्यस्त झाले आहेत़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
9O0KG
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना