मंगळवार, 19 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

आधी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा;मगच मेगा भरती घ्या: ओबीसी संघटना

Tuesday, 24th July 2018 08:19:39 AM

कोरची, ता.२४: सत्तेत येण्यापूर्वी भाजप नेत्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले होते. आता सत्तेत येऊन ४ वर्षे झाल्यानंतर 'त्या' आश्वासनाचे काय झाले? असा सवाल करुन आधी आरक्षण पूर्ववत करा आणि नंतरच मेगा भरतीची प्रक्रिया राबवा, अशी मागणी कोरची तालुका ओबीसी संघटनेने केली आहे.

अलिकडेच शासनाने मेगा भरतीची घोषणा केली आहे. परंतु गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण केवळ ६ टक्के असल्याने या मेगा भरतीला लाभ ओबीसी प्रवर्गातील बेरोजगारांना मिळणार नाही, हे लक्षात येताच कोरची तालुक्यातील सुशिक्षित ओबीसी नागरिकांनी आज तहसीलदारांची भेट घेऊन निवेदन दिले.

२०१४ च्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसीचे आरक्षण ६ टक्क्यांवरून पूर्ववत १९ टक्के करण्याचा करण्याचा निर्धार चामोर्शी येथे झालेल्या जाहीर सभेत विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला होता. परंतु ४ वर्षे लोटूनही ओबीसीचे आरक्षण पूर्ववत करण्यात आले नाही. सत्ताधारी पक्षाचा एकही लोकप्रतिनिधी यावर बोलत नाही, अशी टीका निवेदनात ओबीसी संघटनेने केली आहे. 

ओबीसी प्रवर्गात सुमारे पाचशेहून अधिक जातींचा समावेश असून, त्यांच्यासाठी असलेले अवघे ६ टक्के आरक्षण त्यांच्या संख्येच्या प्रमाणात अतिशय नगण्य आहे. तसेच ते या प्रवर्गावर अन्याय करणारे आणि त्यांना मागासलेपणाच्या गर्तेत लोटणारे आहे. अत्यल्प आरक्षणामुळे शासनाने घोषित केलेल्या मेगा भरतीत ओबीसी प्रवर्गाच्या वाट्याला एकही जागा येणार नसून, ओबीसी युवक शिक्षण सोडून स्वत:ला मजुरी व शेतीच्या कामात झोकून देत आहेत. आरक्षण पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी निवडणूक तसेच जनगणनेवरही बहिष्कार टाकण्यात आला. तरीही या प्रश्नाला जाणीवपूर्वक बगल देण्यात आली.

१४ ऑगस्टपर्यंत मागणी पूर्ण न झाल्यास ओबीसी संघटना स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात अर्धनग्न अवस्थेत राष्ट्रध्वजाला सलामी देतील आणि यानंतरही मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करु, असा इशारा ओबीसी संघटनेने दिला आहे. शिष्टमंडळात ओबीसी संघटनेचे तालुकाध्यक्ष नंदकिशोर वैरागडे, अशोक गावतुरे, भजन मोहुर्ले, राष्ट्रपाल नखाते, राहूल मांडवे महादेव बनसोड, भुमेशवर शेंडे, आसाराम सांडील, राजन मेश्राम, शिखा शेंडे, हेमंताबाई शेंडे, मधुकर शेंडे, विनोद गुरनुले, गोपाल मोहुर्ले, मुरलीधर शेंडे, गजानंद मोहुर्ले, केशव मोहुर्ले, राकेश शेंडे, विठ्ठल शेंडे प्रा.प्रदीप चापले, नितीन शेंडे, धमेंद्र येवले, जितेंद्र मोहुर्ले, शेषराव मोहुर्ले, प्रदीप गावतुरे, खुशाल जनते, अनिल उईके, विनोद गुरनुले, हेमंत शेंडे, हंसराज मोहुर्ले, अशोक गुरनुले अक्षय मोहुर्ले,महेश शेंडे, मुकेश मोहुर्ले, कृषी मोहुर्ले आदींचा समावेश होता.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
0ZTU9
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना