शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

Friday, 20th July 2018 05:39:29 AM

गडचिरोली, ता.२०: मोबाईल चार्जिंग करण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांचा सश्रम कारावास व २ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. नागेश समय्या मडे(२२)रा. वियमपल्ली, ता. सिरोंचा असे दोषी युवकाचे नाव आहे.

ही घटना आहे २९ एप्रिल २०१६ ची. या दिवशी ८ वर्षीय पीडित मुलगी घरी एकटीच असल्याची संधी साधून आरोपी नागेश मडे हा मोबाईल चार्जिंग लावण्याच्या बहाण्याने तिच्या घरी गेला. त्यानंतर तिला आतील खोलीत नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला. शिवाय झालेल्या प्रकाराची माहिती कुणाला दिल्यास जिवानिशी ठार करेन, अशी धमकीही त्याने पीडितेला दिली. त्यानंतर तिने आपल्या आईला आपबिती सांगितली. आईच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी नागेश मडे याच्यावर भादंवि कलम ३७६(२),५०६ व बालकाच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ६ अन्वये गुन्हा दाखल केला. तपास पूर्ण झाल्यावर तत्कालिन पोलिस निरीक्षक दीपक लुकडे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

आज या प्रकरणाचा निकाल लागला. जिल्हा व सत्र न्यायालयाने बचाव पक्षाचे बयाण नोंदवून व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी नागेश मडे यास भादंवि कलम ३७६ व बालैअसं कायद्यान्वये १० वर्षांचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड,  तसेच कलम ५०६ अन्वये १ वर्षांचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. 

सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान व सहायक सरकारी वकील नीळकंठ भांडेकर यांनी काम पाहिले. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
01JDR
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना