गुरुवार, 18 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

गडचिरोलीतील शेतकऱ्यांना शेततळ्यासोबत मोटारपंपही द्या:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Tuesday, 17th July 2018 07:57:12 AM

नागपूर,ता.१७ : 'मागेल त्याला शेततळे' योजनेंतर्गंत गडचिरोली जिल्हयाने लक्षणीय कामगिरी केली आहे. जिल्ह्यात ३६६२ शेततळे पूर्ण झाले. उर्वरित सर्व ५५०० अर्जांना तातडीने मंजुरी द्यावी. तसेच या शेतकऱ्यांना तळ्यांसोबत मोटारपंपही देण्याबाबत कार्यवाही करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

नागपूर येथे विधानभवनाच्या मंत्रिपरिषद सभागृहात गडचिरोली जिल्हयातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी खासदार अशोक नेते, आ.रामदास आंबटकर, आमदार डॉ. देवराव होळी, आ.क्रिष्णा गजबे, मुख्य सचिव डी.के. जैन, अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, सचिव वने तथा गडचिरोलीचे पालक सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड उपस्थित होते.

मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गंत जिल्हयाला १५०० शेततळ्यांचे उद्दिष्ट होते. या योजनेला गडचिरोलीत शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. १० जुलैअखेर पात्र असणारी मंजूर ३६६२ कामे पूर्ण झाली. उर्वरित अर्जांना मंजूर देऊन या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. जलयुक्त शिवार अभियानांतर्गंत गेल्या तीन वर्षात १० हजार ८१७ कामे आतापर्यंत पूर्ण झाली आहेत. तसेच माजी मालगुजारी तलाव दुरुस्ती अंतर्गत १८१ कामे पूर्ण झाली आहेत. सिंचन विहिरी अंतर्गत ३१३८ कामे पूर्ण झालेली आहेत. उर्वरित कामे मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. विविध योजनांमधून जिल्ह्यात जलसंधारणाची कामे मोठया प्रमाणावर झालेली आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांना पाण्याचा वापर करणे शक्य व्हावे, यासाठी विविध विभागाच्या योजनांमधून शेतकऱ्यांना शेतीपंप देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना तसेच प्रधानमंत्री आवास योजना, रमाई व शबरी आवास योजना यांच्या कामाला गती देण्याची आवश्यकता आहे. आवास योजनांच्या कामांसाठी २० अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यापैकी २४ जण सध्या कार्यरत आहेत. त्यामुळे आवास योजनांची कामे गतिमान करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. 

लॉयडस् मेटलतर्फे कोनसरी येथे लोहखनीज प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी काम पूर्ण होईपर्यंत लोहखनिजाची जी वाहतूक चालू आहे, त्यात महिनाभरात स्थानिकांना वाहतुकीचे काम मिळेल, या दृष्टीने प्रशासनाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. या प्रकल्पासाठी कोनसरी येथे जागा देण्यासोबतच ६ इतर सामंजस्य करार झालेले आहेत. त्यात लोहखनीज प्रकल्प सर्वात मोठा आहे. येथे स्थानिक युवकांची निवड करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यावेळी सांगितले.

जिल्हयात दळणवळणाच्या दृष्टिकोनातून मोबाईलचे जाळे अधिक मजबूत असणे आवश्यक आहे. यासाठी बी.एस.एन.एल. ने ४१ टॉवर्सचे कामपूर्ण केले असून २५ टॉवर्स नोव्हेंबर २९१८ पर्यंत कार्यन्वित होतील. या यंत्रणेसाठी मंडळ कार्यालये तसेच पोलिस ठाण्यांमध्ये जागा देऊन काम पूर्ण करुन घ्यावे. जेथे बॅन्डविडथ वाढवणे आवश्यक आहे, तेथे आपल्या स्तरावर पैसे भरा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी दिले. एव्हरेस्ट मोहिमेबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, गडचिरोलीनेही चंद्रपूरप्रमाणे काही उद्दिष्ट ठरवावे. चंद्रपूरचे युवक एव्हरेस्ट सर करुन नुकतेच आले आहेत. त्यामुळे गडचिरोलीहीने असे काही वेगळे उद्दीष्ट ठरवून काम करावे. भामरागड येथील तालुका क्रीडा संकूलासाठी आवश्यक जमिनीचा ताबा क्रीडा विभागाला प्राप्त झाला आहे. याचा अंदाजपत्रकासह आराखडा क्रीडा आयुक्तांना पाठविण्यात येणार आहे.

जिल्हयात अपुऱ्या गोदामांच्या संख्येमुळे बरेचसे धान्य वाया जाते. या पार्श्वभूमीवर पी.पी.पी. अंतर्गंत २२ गोदामांचा प्रस्ताव आहे, तर आदिवासी विकास विभाग १० गोदामांना जागा देणार आहे. या कामांना अधिक विलंब होऊ नये व धानाचे नुकसान टाळणे शक्य व्हावे यासाठी जमिनीचा आगाऊ ताबा घेऊन काम सुरु करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. याबाबतचे प्रस्ताव त्वरित पाठवा. त्यांना १५ दिवसात शासन मंजुरी देईल, असेही ते म्हणाले.

सौर उर्जेवर वीज पुरवठयासाठी दुर्गम अशी ४९ गावे निवडण्यात आली. यापैकी १६ गावांचे काम पूर्ण झाले आहे. 'सौभाग्य' योजनेत प्रत्येक घरात वीज कनेक्शन देण्याचे काम डिसेंबर अखेर पूर्ण होईल. जिल्हयात ५ बॅरेजेची कामे सुरु आहेत. त्यापैकी चिचडोह बॅरेजचे काम पूर्ण झाले असून यातून ६२.५३ दलघमी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. याव्दारे चामोर्शी तालुक्यातील २२४० हेक्टर क्षेत्र देखील सिंचनाखाली येणार आहे. बॅरेज प्रमाणेच उपसा जलसिंचनाची कामे जिल्हयात सुरु आहेत. या प्रकल्पांचे सातत्य राखण्यासाठी सौर उर्जेचा वापर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

महत्वाकांक्षी अशा गडचिरोली-वडसा रेल्वे मार्गासाठी खाजगी जमिनी संपादित करण्याचे काम वनविभागाची परवानगी मिळेपर्यंत थांबवण्याच्या सूचना रेल्वेतर्फे देण्यात आल्या होत्या. वन विभागाची परवानी येत्या ८ दिवसांत प्राप्त होईल. त्यानंतर या कामाला पुन्हा सुरुवात होईल, असे सचिव वने व पालकसचिव विकास खारगे यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या बैठकीत सादरीकरण केले. बैठकीस सर्व विभागाचे सचिव तसेच जिल्हयातील अधिकारी उपस्थित हेाते.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
6GQ44
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना