गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

दाखला दिला नाही म्हणून ग्रामसेवकासह सरपंचास जीवंत जाळण्याचा प्रयत्न

Tuesday, 10th July 2018 05:56:34 AM

कुरखेडा,ता.१०: मुलाच्या शालेय कामाकरिता आवश्यक दाखले देण्यास टाळाटाळ केल्याने संतप्त झालेल्या एका इसमाने ग्रामपंचायत कार्यालयातच ग्रामसेवकासह सरपंचास केरोसीन ओतून जीवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज दुपारी साडे अकरा वाजताच्या सुमारास तालुक्यातील चिखली येथे घडली. मात्र, उपस्थित नागरिकांनी प्रसंगावधान राखत संबंधित इसमास आवरल्याने पुढील अनर्थ टळला.

अरुण फगवा सिंद्राम(३५) रा.चिचटोला (गट ग्रामपंचायत चिखली) असे आरोपीचे नाव आहे. अरुण सिंद्राम यास त्याच्या मुलाच्या शैक्षणिक कामाकरिता ग्रामपंचायतीच्या दाखल्याची आवश्यकता होती. त्याने मागील वर्षांपर्यंतचा गृहकराचा भरणा केला होता. मात्र, चालू वर्षाचे गृहकर भरल्याशिवाय दाखला मिळणार नाही, अशी ग्रामपंचायतीची भूमिका असल्याने त्याला दाखला उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे त्याने आज सकाळी ग्रामपंचायत कार्यालय गाठून तेथील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. शिवाय कार्यालयीन कागदपत्रे उचलून घरी घेऊन गेला. याबाबतची माहिती मिळताच ग्रामसेवक जयगोपाल बरडे व सरपंच तुलसीबाई उईके हे अरुण सिंद्रामच्या घरी जाण्यास निघाले. वाटेतच अरुण त्यांना भेटला. दोघांनीही त्याला ग्रामपंचायतीच्या कागदपत्रांविषयी विचारणा केली. मात्र, अरुणने त्याच्याकडे असलेली कुऱ्हाड उगारुन कार्यालयात येत असल्याचे बजावले. त्यामुळे ग्रामसेवक व सरपंच ग्रामपंचायतीच्या दिशेने माघारी फिरले. त्यांच्या मागेमागेच आरोपी अरुण हादेखील कार्यालयात पोहचला. येताना त्याने प्लास्टिक कॅनमध्ये केरोसीन आणले होते. रागाच्या भरात त्याने सरपंच व ग्रामसेवकावर केरोसीन ओतून दोघांनाही आगकाडीने पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखत उपस्थित नागरिकांनी त्याला पकडून ठेवले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. नागरिकांनी घटनेची माहिती कुरखेडा पोलिसांना दिली. लगेच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीस ताब्यात घेतले. सरपंच तुलसीबाई उईके यांच्या तक्रारीवरून आरोपी अरुण सिंद्राम याच्या विरोधात भादंवि कलम ३०७,४३८,५०४,५०६(२)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार गजानन पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजय वनकर घटनेचा तपास करीत आहेत


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
0HLQ2
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना